Ticker

6/recent/ticker-posts

चला जाणुया नदीला’अभियान लोकसहभागातून यशस्वी करा -- अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

अहमदनगर :- वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे नद्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. प्रदुषणाच्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणुया नदीला’ हे अभियान जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिल्या.
  ‘चला जाणुया नदीला’ या अभियानासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी बोलत होते.
बैठकीस उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. ढोकपौळ, प्रदुषण नियंत्रण विभागाचे चंद्रकांत शिंदे, समन्वयक अजिनाथ ढाकणे, सुभाष देशमुख, विठ्ठल शेवाळे, संपत त्र्यंबकराव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री मापारी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम वर्धा येथून या अभियानाची सुरूवात झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अढळा, अगस्ती, म्हाळुंगी नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. नद्यांविषयी सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होण्याच्यादृष्टीने नद्यांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलीच्या आयोजनाबरोबरच नद्यांवर आधारित निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. एनएसएस, एनसीसी विद्यार्थ्यांसाठी विशेष कँपचे आयोजन करण्यात यावे. या अभियानामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थासह, धार्मिक गुरुंची देखील महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन देखील अपर जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या