जिल्हा परिषद सार्वजनिक
बांधकाम उपविभागातील प्रकार
जनतेची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- ग्रामीण परिसरातील जनतेची कामे वेळेवर व्हावी. याकरिता शासन प्रयत्नशील असून आवश्यक तिथं कार्यालय सुरू केली गेली असली तरी कार्यालयीन कामकाजाचे दिवशीही जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याचा प्रत्यय जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली येथे आला. या प्रकाराने ग्रामपंचायत , कंत्राटदारासह जनतेची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड होत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यक्षेत्र लाखनी , साकोली तालुका आहे. या उपविभागाचे काम अधिनस्त रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे , रस्त्यांचे रुंदीकरण , डांबरीकरण व मजबुतीकरनाकरिता तांत्रिक मार्गदर्शन करणे , सनियंत्रण व देखरेख ठेवणे. याशिवाय २५१५ , ३०५४ , ५०५४ अंतर्गत मजूर कामे करणे. आमदार , खासदार यांचे स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करणे. तथा विकास कामांना तांत्रिक मार्गदर्शन करून पूर्णत्वास नेणे. ग्रामपंचायती मार्फत चालविण्यात येणाऱ्या दलीत वस्ती सुधार योजना. नागरी सुविधेच्या विकास कामांना तसेच घरकुलांना पूर्णत्व प्रमाणपत्र देणे. याशिवाय शासनाने अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे पार पाडणे व विभागीय कामाचे अंदाजपत्रक तयार करणे. हे या उपविभागाचे काम आहे.
या उपविभागात उपविभागीय अभियंत्यासह ५ कनिष्ठ व शाखा अभियंते , अनुरेखक , वरीष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई व चालक याशिवाय स्थायी व अस्थायी मजूर कार्यरत आहेत. या उपविभागाचे कार्यक्षेत्र २ तालुक्यातले असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कामानिमित्त अनेक गावचे सरपंच-उपसरपंच अथवा अंदाजपत्रक तयार करण्याकामी ग्रामसेवक येतात. पण महिला शिपायाखेरिज कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित राहत नसल्याची ओरड होत आहे. विचारणा केल्यास साईड वर गेल्याचे सांगितले जाते. या प्रकाराने लोक प्रतिनिधीसह लोकसेवकही त्रस्त असल्यामुळे या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
*साहेबांचे अपडाऊन सुरूच(चौकट)*
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली येथे नियमित उपविभागीय अभियंता असून ते १०० किमी वरून अपडाऊन करीत असल्यामुळे अपडाऊन मध्येच अधिक वेळ जात असल्याने लोकांची कामे वेळेवर होत नाही.


0 टिप्पण्या