गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात
रिक्त पदे भरण्याची गरज
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- गाव आणि प्रशासन पर्यायाने शासनातील दुवा म्हणून गाव कामगार पोलिस पाटलाकडे पाहिले जाते. याशिवाय गावात अवैध व्यवसायावर वाचक निर्माण करून पोलिसांना सहकार्य करणे. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो. अल्प मानधनावर कार्य करणाऱ्या पोलिस पाटलाची पदे भरण्यास शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ४३ गावे पोलिस पाटलाविणा असल्यामुळे या गावांची शांतता व सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. १ नगर पंचायत आणि ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून त्यातील ९४ गावे लोकवस्तीची , तर १० गावे रिठी तालुक्यात लाखनी व पालांदूर येथे पोलिस ठाणे आहेत. लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीत साकोली तालुक्यातील ४ व भंडारा तालुक्यातील ५ मिळून एकूण ६० गावांचा समावेश आहे. तर पालांदुर पोलिस ठाण्याचे हद्दीत साकोली व लाखांदूर तालुक्यातील गावे मिळून ५८ गावे समाविष्ट आहेत.
लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील ६० गावांपैकी ३६ गावात तर पालांदुर पोलीस स्टेशन हद्दीतील ५८ गावांपैकी फक्त ३८ गावात पोलीस पाटील कार्यरत आहेत. तर उर्वरित ४३ गावे पोलिस पाटलांविना आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत. लाखनी पोलिस ठाणे अंतर्गत २८ गावांत अनुक्रमे लाखनी, राजेगाव/ मोरगाव , रेंगेपार (कोहळी) मासलमेटा, आलेसुर, गराडा, मोगरा, सावरी, चान्ना, निलागोंदी, दिघोरी, सेलोटी, रेंगेपार (कोठा) केसलवाडा (पवार), बरडकिनही, चिखलाबोडी,गुडरी, खुर्सीपार खैरी, मेंढा (पोहरा ), मेंढा (सोमलवाडा ) सिपेवाडा, शिवनी, सोनेखारी, पिंपळगाव खुर्द , नवेगाव रिठी, मानेगाव, चिचटोला तर पालांदुर पोलिस ठाणे अंतर्गत १५ गावांत अनुक्रमे लोहारा,मुरमाडी(तूप.), डोंगरगाव, खराशी, पहाडी, मऱ्हेगाव, कोलारा, कन्हाळगाव, मेंढा, विहिरगाव(क.) हरदोली,मांगली रेंगोळा, केसलवाडा इत्यादी ४३ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने गावगाडा चालवितांना मोठे जिकरीचे झाले आहे. केवळ मानधन तत्त्वावर असलेली पदे शासन का भरत नाही असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
वास्तविक पाहता महसूल आणि पोलिस प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. संकट काळात गावातील गोपनीय आणि सत्य माहिती पोलिस प्रशासनाला पोलिस पाटीलच देत असतो. त्यामुळे गावपातळीवर पोलिस पाटील पद किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते.गावात पोलीस पाटील कार्यरत नसल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती पोलिसांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पोलिस पाटलाची पदे भरणे गरजेचे झाले आहे.


0 टिप्पण्या