रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई :-मुंबई आणि ठाण्यातून गुजराती , राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत . त्या लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही , असे विधान राज्यपाल भगत सिंह यांनी केल्यानं मोठा वादंग माजला होता . अखेर त्या विधानावरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे . २ ९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली , असं म्हणत राज्यपालांनी माफी मागितली . महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे . विशेषत संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे , असंही राज्यपालांनी पत्रकात म्हटले आहे . गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे . आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला . परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही , असंही त्यांनी अधोरेखित केलंय .महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल , असा विश्वास बाळगतो , असंही महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणालेत . राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं . मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही . १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली . यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे . मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते . राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात . त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही , असे शिंदे यांनी स्पष्ट केले होते .


0 टिप्पण्या