सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा: वयाची 18 वर्ष पूर्ण करणा-या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत असले पाहिजे. निवडणूक विभागाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमून नोंदणीच्या कामाला गती दिली आहे. राजकीय पक्षांनी देखील मतदान केंद्र स्तरावर प्रतिनिधी नेमून मतदार नोंदणीच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
मतदार नोंदणी वाढविण्याबाबत श्रीमती बिदरी यांनी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली. त्यांवेळी त्यांनी मतदार नोंदणी वाढविण्याबाबत राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन केले. मतदार यादी निरिक्षक नागपूर येथून ऑनलाईन तर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीष धार्मिक, शिल्पा सोनाले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजकीय पक्षानी पुढाकार घेतल्यास जास्तीत जास्त नावांची नोंदणी करणे शक्य होईल. नोंदणीसाठी पक्षांनी प्रतिनिधी नेमल्यास या प्रतिनिधी मार्फत निवडणूक आयोगाच्या सूचना देखील गावस्तरावर देता येईल, असे पुढे बोलतांना त्यांनी सांगितले. वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे युवक नोंदणीपासुन वंचित राहू नये, यासाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर घेण्यात यावे. आरोग्य विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले व वयोमर्यांदेत बसणा-या दिव्यांगाचा शोध घेऊन त्यांची देखील नावे यादीत समाविष्ठ करण्यात यावी.
देहव्यवसाय करणा-या महिला, कायमस्वरुपी निवासाची व्यवस्था नसलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा देखील समावेश होणे आवश्यक आहे. पुरुषांच्या तुलनेते लोकसंख्येचा विचार केल्यास महिलांची नोंदणी कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. ऑनलाईन नोंदणी अधिक सोईची असल्याने सर्व मतदार नोंदणी अधिका-यांनी व्होटर हेल्पलाईनचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मतदान कार्डला आधार जोडणी
दुबार व बनावट मतदार नोंदणीला आळा घालून मतदार यादी अधिक पारदर्शक बनविण्यासाठी निवडणूक आयेागाने छायाचित्र मतदार ओळखपत्रास आधारकार्ड जोडणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक मतदाराने आपल्या कार्डला आधारची जोडणी करुन घ्यावे. यासाठी राजकीय पक्षाने देखील पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन मतदार यादी निरिक्षकांनी राजकीय पक्षांना बैठकीत केले. जिल्हयात 53 टक्के मतदरांनी आधार कार्डची जोडणी केली असून हे प्रमाण अधिक वाढविणे आवश्यक आहे.
3 व 4 डिसेंबरला विशेष नोंदणी शिबिर
निवडणूक आयोगाने एकही पात्र व्यक्ती मतदानाच्या अधिकारापासुन वंचित राहू नये यासाठी विशेष नोंदणीचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्यानुसार शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी दि. 3 व 4 डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मतदार यादीत नाव नसलेल्यांनी या ठिकाणी अर्ज भरुन आपल्या नावांचा समावेश करुन घ्यावा, असे आवाहन देखील मतदार यादी निरिक्षकांनी केले आहे.


0 टिप्पण्या