अनेकदा मागणी करूनही निधी नाही
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- लोक सेवकांना मुख्यालयी राहून सेवा देता यावी. या करिता संबंधित विभागाकडून कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली. पण वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे ह्या इमारती अखेर च्या घटका मोजत असल्याचा प्रकार वनपरिक्षेत्र लाखनी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट रामपुरी येथे उघडकीस आला. देखभाल दुरुस्ती अभावी या वनरक्षक निवासस्थानात वास्तव्य करणे अशक्यप्राय बाब आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त येणाऱ्या वनरक्षक बीट रामपुरी येथे दिघोरी, नांन्होरी, मोगरा, शिवणी, धाबेटेकडी, चीचटोला, कन्हाळगाव व रामपुरी या गावांचा समावेश होतो. पुरातन व मोठ्या झाडाचा जंगल म्हणून या बीटाची ख्याती आहे. या वनरक्षक बीटात सागवान, बिजा, साजा, गरडी या सारखी इमारती लाकडे. आंबा, जांभूळ, मोह या सारखी फळ झाडे, आवळा, बेहळा, कवट, बेल या सारखी औषधी वनस्पती आहेत. मोठ्या झाडाचा व झुडपी जंगल असल्याने यात बिबट, अस्वल, लांडगा या सारखे हिंस्त्र श्वापदे. ससा, हरीण, सांबार, घोडेनील, रानडुक्कर यासारखे तृणभक्षी प्राणी तर साप, विंचू, घोरपड या सारखे सरपटणारे प्राणी व विविध प्रकारची फुलपाखरे ह्या वनरक्षक बीटाचे वैभव आहे.
वनसंपदा आणि वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी वनक्षकास मुख्यालयी वास्तव्य करता यावे. या करिता रामपुरी/टोली येथे २५ वर्षापूर्वी वन विभागाने वनरक्षक निवास स्थानाचे बांधकाम केले होते. या ठिकाणी अनेक वन रक्षकांनी वास्तव्यही केले. पण मागील ७ ते ८ वर्षापासून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने वनरक्षक निवास स्थानाची दुर्दशा झाली आहे. या नादुरुस्त इमारतीत वास्तव्य करणे म्हणजे दुर्घटनेला निमंत्रण देणे असल्याने वनरक्षक निवासस्थान इमारत दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे.


0 टिप्पण्या