• खैरी/पिंपळगाव येथील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- निर्माणाधीन जलकुंभावर ३० ते ३२ फूट उंचीवरील सेंट्रिंग काढतांना बल्ली घसरल्याने तोल जाऊन खाली पडल्याने मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी(ता.०९) दुपारी १:०० वाजताच्या सुमारास खैरी/पिंपळगाव येथे घडली. जखमीस उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले. उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू झाला. मजुराचे नाव राकेश विश्र्वपाल उके(२२) रा. चिचाळ/आकोट, तालुका पवनी असे आहे.
ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे. या करिता जलजीवन मिशन अंतर्गत खैरी/पिंपळगाव येथे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. जलकुंभ, जलस्त्रोत, पाइपलाइन स्विच रूम असे बांधकामाचे स्वरूप होते. हे काम अरविंद कन्स्ट्रक्शन कंपनी भंडारा यांना देण्यात आले असले तरी हे काम टक्केवारीने धाबेटेकडी येथील एक कंत्राटदार करतो आहे. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग साकोली चे कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांचेकडे सोपविण्यात आले होते. मागील महिनाभरापासून जलकुंभाचे काम सुरू होते. यावर चिचाळ, तालुका पवनी येथील ६ मजूर कामावर होते. त्यात मृतक राकेश उके याचाही समावेश होता. तो नेहमीप्रमाणे ३० ते ३२ फूट उंचीवर काम करीत असताना बल्ली घसरल्याने अचानक तोल जाऊन खाली पडून गंभीर जखमी झाला. कामावरील सहकारी मजुरांकडून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भर्ती करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. पण सहकाऱ्यांनी त्याला भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात भर्ती केले. उपचारादरम्यान त्याचा रविवारी सायंकाळी ४:०० वाजता दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. कर्तव्यावरील पोलिस अमलदार विलास खोब्रागडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वृत्त लिहीपर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सांगितले.
*घटनेबाबद कनिष्ठ अभियंता अनभिज्ञ(चौकट)*
खैरी/पिंपळगाव येथे निर्माणाधीन जलकुंभावरून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या कामावर देखरेख ठेवणाऱ्या कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांना विचारणा केली असता त्या घटनेबाबद अनभिज्ञ होत्या. तसेच संबंधितांना विचारून उद्या माहिती देतो असे सांगितले.


0 टिप्पण्या