• सततधार पावसाने शेतशिवार जलमय
• शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- लाखनी तालुक्यात आठवडाभरापासून संततधार पावसाच्या सरीवर सरी बरसत असल्याने सर्वत्र शेतशिवार जलमय झाले आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतात रोवणीची कामे जोमात सुरु आहेत. रोवणी करण्यासाठी महिला मजुरांची मजुरी वाढली आहे. सध्या लाखनी शहरात ३८० ते ४०० मजुरी सुरू असून ग्रामीण परिसरात २५० ते ३०० असल्यामुळे आवाक्याबाहेरची आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात असला तरी भरपूर मजुरीतही रोवणी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
रोहिणी नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होत असलीं तरी मृगाच्या शेवटी आणि आद्रा नक्षात्रापासून शेतकरी पेरणीसह रोवणी च्या कामाला लागलेला आहे. १२ व १३ जुलै पासून ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे तालुक्यात रोवनीच्या कामाला वेग आला असून मिळेल तेवढ्या महिला मजुरात शेतकरी आपली शेतातील रोवणी आटोपण्याच्या तयारीत आहेत. सकाळ पाळीत व दुपार पाळीत रोवने सुरू असून सकाळी ६ ते ८ व दुपार पाळीत १० ते ५:३० दरम्यान रोवणी केली जाते. तर शहरात मजुरीचे दर अधिक असल्याने सकाळपासूनच परिसरातील महिला येत असतात. त्यामुळे शहरातील चौकात सकाळपासूनच महिला मजूर, शेतकरी व ऑटो चालक यांची रीघ(रांग) लागलेली असते.
जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. आद्रा नक्षत्रातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर निसर्गाने बळीराजाची हाक ऐकली व १२ जुलै पासून दिवस रात्र पावसाच्या सरी बरसल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वाना हायसे वाटले. मात्र दुसऱ्या दिवसपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसासह रिमझिम पाऊस सुरू केली. तर १८ जुलै पासून जिल्हा प्रशासनाने वेधशाळेच्या सूचनेनुसार जिल्ह्यात "ऑरेंज अलर्ट" घोषित करून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. रोवणी चे दर वधारले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे तालुक्यात चित्र दिसत आहे.
*ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकावर बुरशीजन्य रोग(चौकट)*
चुलबंद नदी खोऱ्यात पावसाळी भाजीपाल्याची लागवड केली जाते. मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि संततधार पावसामुळे सूर्यदर्शन झाले नसल्याने भाजीपालाजन्य पिके भेंडी, वांगे, कारले, कोहळा, लवकी, चवळी इत्यादी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच शेतशिवारात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.


0 टिप्पण्या