• गडेगाव लाकूड आगार समोरील महामार्गावरील घटना
• मृतक बिबटाचे वय ५ ते ६ वर्षे दरम्यान
• वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळावर
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- कोका वन्यजीव अभयारण्यातून वन परिक्षेत्र अड्याळ सीमेत प्रवेश करण्यासाठी लाकूड आगार गडेगाव समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून मार्गक्रमण करीत असताना कोण्यातरी भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी(ता.२०) पहाटे ३ वाजता चे सुमारास उघडकीस आली. मृतक बिबटाचे वय ५ ते ६ वर्षे असून बिबटावर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत शव विच्छेदन करून लाकूड आगारात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळ परिसरात या आधीही वाहनांचे धडकेत वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
लाकूड आगार गडेगाव परिसरात वन परिक्षेत्र लाखनी, भंडारा व अड्याळ च्या सीमा मिळलेल्या असून कोका वन्यजीव अभयारण्यातून उमरेड करांडला अभयारण्यात जाण्याचा हा वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ओलांडून पलीकडे जावे लागते. गुरुवारी पहाटेचे सुमारास लाकूड आगार गडेगाव समोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञान वाहनाचे धडकेत ठार झालेला बिबट महामार्गावर पडून असल्याचे महामार्ग कर्मचाऱ्यांनी लाखनी चे क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांना कळवून गडेगाव चे वनरक्षक एम.एल. शहारे, लाखनी चे वनरक्षक त्रिवेणी गायधने यांचेसह घटनास्थळ गाठून चौकशी केली असता घटनास्थळ वन परिक्षेत्र भंडारा चे अधीनस्त सह वनक्षेत्र कोका चे कार्यक्षेत्रात असल्याचे समजताच क्षेत्र सहाय्यक आर.बी. धारने यांना घटनेची माहिती दिली.
लाखनी चे वन परिक्षेत्र अधिकारी एस.पी. गोखले, भंडारा चे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, गडेगाव लाकूड आगाराचे वन परिक्षेत्र अधिकारी कुमारी जी.एम. नेवारे घटनास्थळी पोहचले. त्यांचे मार्गदर्शनात लाकूड आगार डेपोतील मजुरांचे साहाय्याने मृत बिबटास लाकूड आगारात हलविण्यात आले. सर्व सोपस्कार आटोपून पशू वैद्यकिय अधिकारी निपाने यांना माहिती देण्यात आली. उपवनसंरक्षक राहुल गवई, साकोली चे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, भंडारा चे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांचे मार्गदर्शनात मृतक बिबटाचे शव विच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वन अधिकाऱ्यांसह कोका क्षेत्र सहाय्यक आर.बी. धारने, वनरक्षक नेवारे, मांडवी चे वनरक्षक ए.एम. उपाध्याय यांचेसह लाकूड आगार गडेगाव चे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. गडेगाव लाकूड आगारसमोरील महामार्गावर या आधीही हरीण, रानडुक्कर या सारख्या तृणभक्षी प्राण्याचा वाहनाचे धडकेत मृत्यू झाला असल्याने या परिसरात उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या