• गुरू रविदास क्रांती मोर्चाचे राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा:- खातखेडा, जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील अनुसूचित जाती(चर्मकार) समाजाच्या एका युवकाचा सामूहिकपणे निर्घुण खून करण्यात आला. मारेकऱ्यांवर मोक्का लावण्यात यावा या करिता राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे वतीने लाखनी चे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
खातखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील चर्मकार युवक नारायण रतन पवार(२२) याचा ७ ऑगस्ट रोजी गावातील प्रवीण काकुळते व इतर १७ इसमांनी लाता बुक्क्या व काठीने मारहाण करून नंतर घराबाहेर नेऊन विहिरीत फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आई, वडील, भाऊ व बहीण यांनाही मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असला तरी १० आरोपी फरार आहेत. सर्व गुन्हेगारांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. तपासात हयगय करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करावे, खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करावा, पिडीत परिवारास ५ लाखाची मदत करून आरोपीवर मोक्का लावावा, चर्मकार कुटुंबास संरक्षण द्यावे. तथा आरोपींना जामीन मिळू नये. यासाठी प्रयत्न करावा. अशा मागण्यांचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर स्वप्नील काटवले, शुभम खवसकर, शामराव पंचवटे, विकास गडकरी, श्रावण खवसकर, राजेश भदाडे, सौरभ हटवार, आशिक भैसारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


0 टिप्पण्या