कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा:- नैसर्गिक, सेंद्रिय म्हणून पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेता शेतकरी शेतात तणनाशक मारत आहेत. परिणामी, पालेभाज्या व रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रानभाज्यांची चव दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. धान पिकावरील तणाला यंत्राचा पर्याय नसल्याने तसेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तणनाशकापासून होणाऱ्या नुकसानबाबत जनजागृती व प्रबोधनाच्या अभावामुळे अपयश आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकामधील तण संपुष्टात आणण्याकरिता तसेच धुऱ्या पाळीवरील गवत व वेलींचा नायनाट करण्यासाठी तणनाशकाचा उपयोग करीत असल्याने नैसर्गिक रानभाज्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रानभाज्या आरोग्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक आहार असून पावसाळ्यात ग्रामीण परिसरातील शेतात उगविणाऱ्या आंबाडी, काटवल, कडूची भाजी, उंदीर कान, तरोटा आदी रानभाज्या पावसाळ्यात आनंदाने जेवणात असायच्या पण तणनाशकाच्या अत्याधिक वापरामुळे रानभाज्या अलीकडच्या काळात दुर्मिळ होऊ लागल्या आहेत.
*शेतीला रोजगार हमीची जोड आवश्यक(चौकट)*
शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, मजुरांची टंचाई आणि वाढलेले दर शेतकऱ्यांना परवडेनासे झाल्यामुळे नाईलाजाने शेतकरी तणनाशकाकडे वळला आहे. शासनाने शेती कामाकरिता रोजगार हमीची जोड घातल्यास शेतकऱ्यांना मजूर मिळतील व तणनाशकाचा वापर कमी होईल. मजूरटंचाईचा प्रश्नसुद्धा मार्गी लागू शकतो त्यामुळे शेतीला रोजगार हमी जोड आवश्यक आहे.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
रोग आणि कीड व धानामध्ये होणार गवत तथा आजूबाजूला वाढणाऱ्या वेलिंचा नायनाट करण्यासाठी शेतकरी तणनाशकाकडे वळला. पण या प्रकाराने नैसर्गिकपणे मिळणाऱ्या रानभाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
*रवींद्र उपरीकर, प्रगतिशील शेतकरी*


0 टिप्पण्या