Ticker

6/recent/ticker-posts

बिबटाचा गोठ्यातील शेळ्यावर हल्ला, ६ शेळ्या ठार

• सालेभाटा येथील घटना 

• पशुपालकाचे ४० हजाराचे नुकसान   

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सालेभाटा येथे मध्यरात्रीचे सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबटाने हल्ला केल्याने  ३ शेळ्या,१ बोकड,२ पाटर  ठार झाल्याची घटना रविवारी (ता.२०)   पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालकाचे नाव वासुदेव लेंडो  टेंभुर्णे   (६५) रा. सालेभाटा असे असून त्याचे अंदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली असली तरी पशूपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
        वासुदेव  टेभूर्णे हे भूमिहीन शेतमजूर असून शेती नसल्याने कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी शेळी पालनाचा व्यवसाय करतात. रवीवारी रात्री घरच्या पाळीव प्राण्यांना चारापाणी करून गोठ्यात बांधले व कुटुंबीयांसह  झोपी गेले.  मध्यरात्रीचे सुमारास अचानक गोठ्यात शिरून बिबटाने हल्ला केल्याने शेळ्यांनी मोठमोठ्याने आरडा- ओरड केली असता झोपमोड झाल्याने पशूपालकाने गोठ्यात जाऊन पाहिले असता  ३ शेळ्या , १ बोकड,२ पाटर मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी.गोखले ,    प्रभारी क्षेत्र सहाय्यक जे.के.दिघोरे लाखनी यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक त्रिवेनी गायधने लाखनी, वनरक्षक एम.एल.शहारे गडेगाव, तसेच सर्पमित्र सलाम बेग घटनास्थळी गेले व मृत शेळ्यांचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती देण्यात आली. डॉ योगेश कापगते व परिचर अमित देशमुख पशुवैद्यकीय दवाखाना लाखोरी यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळ्याचे शवविच्छेदन करून पशुपालकाचे ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. शेळ्याचे मृतदेह जमिनीत पुरण्यात आले. या घटनेमुळे पशुपालकांसह गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  


वन विभागाकडून पशू पालकांना आवाहन

 अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वन्यजीव संरक्षित  वनक्षेत्र असून पावसाळ्यामुळे वनक्षेत्र घनदाट झाल्याने वन्यप्राणी रात्रीचे वेळी गावालगत वास्तव्यास येतात. त्यामुळे पशू पालकांनी रात्री शेकोट्या पेटवून किंवा लाईट सुरू ठेवून पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. हिंस्त्र प्राणी दिसल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या