धुळे :-शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत ५ लाख रूपये किंमतीच्या गांजासह २२ लाख ८९ हजार २४४ रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून गांजा तस्करी करणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे.
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना शहरातील चाळीसगावरोड चौफुलीजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकमध्ये आबीद हुसेन शेख (२८) रा.नुर मशिद, ऐंशी फूटी रोड, धुळे हा सरकी व फटाक्यांच्या बॉक्स आड सुरत येथे गांजाची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एलसीबी चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पथकास कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने चाळीसगाव रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ सर्व मोहिम राबविली असता आबीद शेख एका ट्रकमध्ये आढळून आला. पोलिसांच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता सरकी व फटाक्यांच्या बॉक्समागे गोण्यांमध्ये गांजा भरलेला आढळून आला.
यावेळी पोलिसांनी सदर गाज्याचं मोजमाप केली असता तो २० हजार १३५ कि.ग्रॅ. एवढा भरला, त्याची किंमत ५ लाख १ हजार ३७५ रूपये एवढी आहे. या कारवाईत ५ लाख १ हजार ३०५ रूपये किंमतीचा गांजा, १२ लाख रूपये किमतीचे वाहन, ३ लाख ३७ हजार ८६९ रूपये किमतीची सरकी व अडीच लाख रूपये किमतीचे फटाक्यांचे १५३ बॉक्स असा एकूण २२ लाख ८९ हजार २४४ रूपयांचा मुद्देमाल धुळे पोलिस पथकाच्या हाती लागला असून अधिक चौकशीत आबीदने सदरचा गांजा हा गुडू (पुर्ण नाव निष्पन्न नाही) रा. नूर मशिद, ऐशीफुटी रोड, शिवाजीनगर, धुळे यांचे सांगण्यावरून गुजरात राज्यातील सुरत येथे नेण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी धुळे एलसीबीचे कर्मचारी गुणवंत पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मानवी मनावर परिणाम करणारे पदार्थांच्या तस्करी केल्या प्रकरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे, सपोनि गणेश फड़, धुळे एलसीबीचे पोसई प्रकाश पाटील, असई संजय पाटील, पोहेकॉ संदीप सरग, सुरेश भालेराव, पोना रविकिरण राठोड, पोकों गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशिल शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी या एलसीबीच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.
मुख्य म्होरक्या फरार
या कारवाईत पोलिसांना मुख्य म्होरक्या मात्र हाती लागू शकला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


0 टिप्पण्या