Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत स्तरावरील संघटनांचे संपामुळे गावगाडा तीन दिवस ठप्प



• ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावित, लोकांची कामे रखडली

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायती मधील कार्यरत लोक प्रतिनिधी व लोकसेवकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरणासाठी सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत शिपायांच्या संघटनांद्वरा १८ ते २० डिसेंबर पर्यंत संप पुकारल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावित ३ दिवस झाल्याने गावगाडा ठप्प होण्याचे मार्गावर असून लोकांची कामे रखडली आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सर्व संघटनांनी एकजूट दाखवून ऐतिहासिक संप घडवून आणला आहे. संपात सहभागी सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सभापती प्रणाली सार्वे व गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन दिले आहे. 
             त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेत ग्रामस्तरावर ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व असून विकासाचा आराखडा ठरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. सरपंचाचे नावे कामकाज चालते, सरपंचाला कायदेविषयक सल्ला, योजनांची यशस्वी अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीचे दस्ताऐवज सांभाळण्याकरिता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाजासाठी संगणक परिचालक, मनरेगा करिता रोजगार सेवक तथा ग्रामपंचायत कमिटी व ग्रामसेवकाचे मदतीला शिपाई व पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीत १०३ गावे समाविष्ट असून ९३ लोक वस्तीची तर १० गावे रीठी आहेत. सरपंच ७१, ग्रामसेवक ३९, ग्रामविकास अधिकारी ५, रोजगार सेवक ७१, शिपाई व पाणी पुरवठा कर्मचारी १२६, संगणक परिचालक ७१ सर्वच सोमवार पासून ३ दिवस संपावर आहेत. हाच प्रकार जिल्हासह राज्यातही आहे. 
              महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व संघटना त्यात अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन सर्व, संगणक परिचालक संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन विविध प्रलंबित व न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता १८/१२/२०२३ ते २०/१२/२०२३ या कालावधीत ऐतिहासिक संप(कामबंद आंदोलन) पुकारण्यात आले आहे. ग्रामपंचायत ग्रामीण भागाचे विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून सुद्धा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या लोक प्रतिनिधी व कर्मचारी यांच्या मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्या जात आहेत. त्या सोडवणुकीसाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सर्व संघटना या संपात सहभागी झाल्याने गावगाडा ठप्प होऊन लोकांची कामे रखडली आहेत. राज्याचे इतिहासात प्रथमतःच सर्व संघटना एकत्र आल्याचे दिसून येते. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे व गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या