Ticker

6/recent/ticker-posts

नवोदय विद्यालयातील वस्तीगृह बांधकाम तात्काळ सुरू करा


• पालकांचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324

भंडारा :- जिल्ह्यातील पाचगाव च्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाचे वस्तीगृह बांधकाम मंजूर असून सुद्धा सुरू केले गेले नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रात क्षमतेपेक्षा निम्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने वसतिगृह बांधकाम तात्काळ सुरू करावे. या करिता पालकांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना मंगळवार(ता.२०) रोजी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात. याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे. 
              भंडारा जिल्ह्याचे विभाजनापूर्वी साकोली येथे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय भाड्याचे घरात होते. त्यानंतर नवेगाव/बांध येथे स्वतःचे इमारतीत हलविण्यात आले. जिल्हा विभाजनानंतर नवेगाव गोंदिया जिल्ह्यात गेल्याने भंडारा जिल्हा केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयास पोरका झाला होता. जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पालक वर्गाचे मागणीनुसार पाचगाव, तालुका मोहाडी येथे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयास सुरुवात करण्यात आली. सुसज्ज शाळा व वसतिगृहाची इमारत असली तरी वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे वसतिगृहाच्या इमारती अपुऱ्या आहेत. अपुऱ्या इमारतीत विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पालक सभेत या विषयावर नेहमीच चर्चा होते. प्राचार्य मुकुंद बलवीर यांनी वरिष्ठांना अनेकदा पत्र व्यवहार केला असला तरी दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुढच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी भरतीचा प्रश्न आवासून उभा आहे. नवोदय विद्यालयाने गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रात सुद्धा नावलौकिक संपादन केला आहे. सध्याची विद्यार्थी संख्येचा विचार करून नवीन वसतिगृह इमारतीस मंजूरी प्रदान करण्यात आली असली तरी बांधकाम सुरू केले गेले नाही. याचा परिणाम पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थी भरतीवर होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर वसतिगृह बांधकाम सुरू करावे. या करिता पालकांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन दिले आहे. विनोद धारगावे, सचिन घनमारे, ओम गायकवाड, प्रदीप कळंबे, उमेश धावडे, रागिणी ऊईके, अश्विन चांदेवार, विनोद बावनकुळे, रंजित बागडे, विलास राऊत, राखी मेश्राम, नरेंद्र घोनमोडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या