Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता रुंदीकरण कामात माती मिश्रित मुरुमाचा वापर


• पोहरा ते धाबेटेकडी रस्त्यावरील प्रकार 

• शाखा अभियंत्याचे दुर्लक्ष 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324

भंडारा :- रस्ते विकासासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेतील अभियंत्याचे उदासीन धोरणामुळे उद्देशपूर्ती होत नसल्याचा प्रत्यय पोहरा ते धाबेटेकडी रस्ता रुंदीकरण कामात आला. शाखा अभियंता व कंत्राटदाराचे संगनमताने रस्ता रुंदीकरण कामात माती मिश्रित मुरुमाचा वापर केला जात असल्यामुळे बांधकाम निकृष्ट प्रतीचे होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी लोक प्रतिनिधींचे मौन परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. 
           पोहरा येथे सिलमीनाइट खान परिसरात मजूरांना येणे-जाणे तथा शेतशिवारात जाण्यासाठी तसेच मानेगाव/सडक ते पालांदूर व पिंपळगाव/सडक ते खराशी रस्त्यास जोडण्याचे काम पोहरा ते धाबेटेकडी रस्ता करतो. त्या वेळची लोकसंख्या व वाहन संख्या लक्षात घेऊन या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. सध्या लोकसंख्या तथा दुचाकी व चारचाकी वाहनांचे संख्येत भरमसाठ वाढ झाल्यामुळे या रस्त्यावरून आवागमन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. तथा वाहनांना ओव्हरटेक करतांना त्रासदायक ठरत असल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये. या करिता जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे तथा युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष यशवंत खेडीकर यांचे मागणी वरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने पोहरा ते धाबेटेकडी रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण कामास आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. 
           २.४०० किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे कामाची प्रशासकीय मान्यतेनुसार अंदाजपत्रकिय रक्कम ३ कोटी ७० लाख रुपये असून ई-निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट मे. परमार गोंदिया यांना देण्यात आले आहे. यावर तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली चे उपविभागीय अभियंता डी.एस. मटाले यांचे मार्गदर्शनात शाखा अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे. सध्या हे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून रस्त्याचे एका बाजूस एक ते दीड मीटर रुंद खोदकाम करून त्यात काळी गिट्टी व माती मिश्रित मुरुमाचा वापर करून रोलर द्वारा दबाई केली जात असली तरी पाण्याचा वापर केला जात नाही.  रस्ता रुंदीकरण कामात माती मिश्रित मुरुमाचा वापर करण्यात येऊन काम निकृष्ट दर्जाचे होत असले तरी लोक प्रतिनिधींचे मौन परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. या रस्ता रुंदीकरण कामाचे कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येण्यास फार वेळ लागणार नाही. 


माहिती व सूचना फलक नाही

शासकीय योजनेअंतर्गत करण्यात येणारी विकास कामे सुरू करण्यापूर्वी दर्शनी भागात माहिती व सूचना फलक लावण्यात यावे. असे शासनाचे दिशा निर्देश असून त्यावर कामाचे नाव, योजनेचे नाव, आर्थिक वर्ष, यंत्रणेचे नाव, कंत्राटदाराचे नाव, साहित्याचा उपयोग तसेच काम सुरू झाल्याचा दिनांक इत्यादी बाबी अंतर्भूत करण्याच्या सूचना असल्या तरी पोहरा ते धाबेटेकडी रस्ता रुंदीकरण कामावर माहिती व सूचना फलक लावण्यात आलेले नाही.


चोरीच्या मुरुमाचा वापर

पोहरा ते धाबेटेकडी रस्ता रुंदीकरण कामात अंदाजे ५०० ते ६०० ब्रास मुरुमाची आवश्यकता होती. पण कंत्राटदाराने निम्म्यापेक्षा कमी रॉयल्टी काढून उर्वरित चोरीच्या मुरुमाचा वापर केला असल्याच्या गावात चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या