• ८२ कामावर २ हजार ९७२ मजूर कार्यरत
• दखल चित्रा न्युज च्या वृत्ताची
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324
भंडारा :-लाखनी येथील पंचायत समितीच्या वार्षिक नियोजनात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची हजारो कामे समाविष्ट असून यापासून १ कोटी ५ लाख ३८ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार असली तरी ११ फेब्रुवारी पर्यंत मजूर प्रधान कामांना सुरुवात केली गेली नव्हती. त्यामुळे मजूरांना वर्षभरात १०० दिवस रोजगार उपलब्ध होईल का ? असा प्रश्न निर्माण होत असल्याने पंचायत समिती प्रशासनाच्या तुघलकी कारभाराचे दर्शन झाले असल्याचे चित्रा न्युज चे १२ फेब्रुवारी चे अंकात "पंचायत समिती प्रशासन मजूरांना काम देण्यास अपयशी" या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आणि ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावरील कामांना सुरुवात केली. आजघडीस ८२ कामांवर २ हजार ९७२ मजूर कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीला वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरुवात केली. ती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात सुरू आहे. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे नियोजन, सनियंत्रण व अंमलबजावणी ची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून या करिता ग्रामसेवकाचे मदतीस रोजगार सेवकाची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. कामे सुचारू पद्धतीने चालावी याकरिता पंचायत समिती स्तरावर मग्रारोहयो चा स्वतंत्र विभाग कार्यरत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ लाख रुपयांपर्यंत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकारी यांचेकडे आहेत.
तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीत १०३ गावे समाविष्ट असून ९३ लोकवस्तीची तर १० गावे रीठी आहेत. लोकसंख्या १ लाख २८ हजार ५५४, कुटुंबसंख्या २५ हजार ४९९, मजूर संख्या ४९ हजार ५३१ तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या १७ हजार १४० आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २०२३-२४ च्या वार्षिक नियोजनात एकूण ३७ हजार ३८ कामाचा वार्षिक नियोजनात समावेश केला आहे. त्यावर ४३ हजार ५२ लाख रुपये खर्च होणार असून १ कोटी ५ लाख ७८ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत ६० टक्के अकुशल(मजूर प्रधान) आणि ४० टक्के कुशल(बांधकाम) कामांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिना शिल्लक आहे. पण वार्षिक नियोजनात समाविष्ट कामांचे अंदाजपत्रक तयार केले गेले असले तरी तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता दिली गेली नाही. तसेच मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण कामांना सुरुवात केली गेली नाही. त्यामुळे शासनाला मजुरांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करणे शक्य होईल काय ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्रा न्युज मध्ये वृत्त प्रकाशित होताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले व घरकुल ३८, महोगणी वृक्ष लागवड ५, गोठा बांधकाम १०, भात खचरे ३, शोषखड्डा बांधकाम ५, सिंचन विहीर ८, कुशल सिमेंट रस्ते ४, मामा तलाव ४, बंधारा व नाला सरळीकरण ३, शेततळा १, पांदन रस्ता १ अशा एकूण ८२ कामावर २ हजार ९७२ मजूर कार्यरत आहेत. पंचायत समिती प्रशासनाला जाग आणल्याबद्दल चित्रा न्युज चे अभिनंदन होत आहे.


0 टिप्पण्या