• प्रकरण रामपुरी बीटात विद्युत शॉक ने अस्वलाची शिकार केल्याचे
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324
भंडारा :- लाखनी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिनस्त वनरक्षक बीट रामपुरी येथे विजेच्या जिवंत तारातून वीज प्रवाह सोडून २ नर अस्वलांची शिकारी केल्याची घटना रविवारी सकाळचे सुमारास वनक्षेत्रालगत च्या शेतशिवारात उघडकीस आली होती. शिकारी टोळीचा शोध घेण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असून शिकारी टोळीबाबद माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस देण्याचे रामपुरी आणि परिसरात सूचना फलक लावले असून संशयितांची चौकशी सुरु करण्यात आल्यामुळे अस्वल शिकार प्रकरण वन विभागाने गंभीरतेने घेऊन ॲक्शन मोडवर असल्याच्या चर्चा होत आहेत.
वनरक्षक बीट रामपुरी हे पुरातन मोठ्या झाडाचे वनक्षेत्र म्हणून ख्याती प्राप्त असून यात बहुमूल्य वन संपदेसह फळ झाडे व वन औषधी याशिवाय हिंस्त्र श्वापदे, तृणभक्षी प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास आहे. पण या वनक्षेत्राची जबाबदारी एकमेव वनरक्षकावर असली तरी निवासस्थान नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे वनरक्षक इतरत्र वास्तव्य करतो त्यामुळे या परिसरात वन तस्कर व शिकारी टोळ्यांचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधीही या वनरक्षक बीटात मोगरा येथे रानडुक्कराची मास विक्री व विजेच्या जिवंत तारात वीज प्रवाहित करून हरिणाची शिकार करण्यात आल्याची घटना शिवणी येथे घडली होती. पण वन्य प्राण्यांच्या शिकारी थांबविण्यासाठी वन विभागाने कसलीही उपाययोजना केली नव्हती.
वनरक्षक बीट रामपुरी कोका वन्यजीव अभयारण्य तथा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असल्यामुळे यातून वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग आहे. तसेच या बीटात हिंस्त्र श्र्वापदांचाही अधिवास आहे. रविवारी रामपुरी वनक्षेत्रालगतच्या शेतशिवारात विजेच्या जिवंत तारातून विद्युत प्रवाह प्रवाहित करून २ नर अस्वलांची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वन विभाग खडबडून जागा झाला व उपवन संरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले आणि सहकारी वन कर्मचाऱ्यांनी रामपुरी आणि परिसरातील गावात सूचना फलक लावून माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस देण्याची तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याची सूचना केली आहे. या आधी शिकार प्रकरणात संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली असल्यामुळे शिकाऱ्यांच्या शोधार्थ वन विभाग ॲक्शन मोडवर असल्याच्या चर्चा होत आहेत.


0 टिप्पण्या