किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड - मराठा नायक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलन लढ्यामुळे शासन-प्रशासन युद्ध पातळीवर कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचे कार्य सुद्धा गेल्या काही दिवसात शासन-प्रशासनाकडून करण्यात आले. याच अंतर्गत बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोध मोहिमेकरिता निजामकालीन दस्तऐवज तपासणीचे काम करण्याकरिता बीड जिल्ह्यातील काही उर्दू शाळातील उर्दू शिक्षकांना जिल्हा प्रशासनाने पाचारण केले होते. या उर्दू माध्यमातील अनेक शाळातील २१ शिक्षक कुणबी नोंदी शोधण्यासाठी जवळपास महिनाभर दररोज सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत प्रशासनाच्या दिमतीला होते. या उर्दू शिक्षकांनी निजामकालीन दस्तऐवजातून कुणबी नोंदी शोधून काढल्यामुळे शासन-प्रशासनाचे काम बरेच सोपे झाले व समोर आलेल्या आकडेवारीमुळे शेवटी एकदाचे राज्य शासनाने दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून त्यात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत दहा टक्के आरक्षण घोषित केले. या पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांनी कुणबी नोंदी शोध मोहिमेत विनामूल्य सहकार्य केले, त्या सर्वांच्या बहुमूल्य शोध कार्याची व विनामूल्य योगदानाची नोंद घेत तंज़ीम तरक़्क़ी उर्दूचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद हसीन अख़्तर यांनी त्यांच्या हसीन कॉलनी येथील ख़्वाब ए अख़्तर या निवासस्थानी या सर्व शिक्षकांच्या सन्मानासाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 मंगळवार रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता एक कार्यक्रम आयोजित करून या सर्व शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ह्रदयी सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उर्दू दैनिक तामिर चे ज्येष्ठ संपादक तथा सेवानिवृत्त शिक्षक काज़ी मख़दूम हे होते तर उर्दू पत्रकार प्रा. शेख जावेद पाशा, डॉ. सिराज खान आरजू आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिल्लिया वरिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नासेर बागवान यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सय्यद रेहान अख़्तर या विद्यार्थ्यांने केलेल्या क़ुरआन पठणाने करण्यात आली तर शेवटी कार्यक्रमाचे आयोजक सय्यद हसीन अख़्तर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात मिल्लिया शाळेचे पठाण रियाज खान, सय्यद एजाज अख्तर, कादरी मज़हर, सय्यद मोईनोद्दीन, खान असरार, अन्सारी अब्दुल वफी, शेख ख़ुर्शीद. नॅशनल उर्दू शाळेचे शेख जमीर, शेख मुहम्मद अख़ील, मुहम्मद फहिमोद्दीन, काज़ी मुजीबुर्रहेमान. हज़रत बालेपीर स्कूलचे मुहम्मद शोएब अली, सय्यद ज़की, शेख मुहम्मद कासम. बहादूर शाह जफर शाळेचे इमरान खान, सय्यद अब्दुल बारी. पीपल्स उर्दू हायस्कूलचे मोहसीन खान. संत जय गुरु माऊली उर्दू शाळेचे शेख टी.एस., सय्यद आर.ए. इंदिरा गांधी उर्दू शाळेचे सय्यद लईख़, शेख आबेद या सर्व कुणबी नोंदी शोधण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तंज़ीम तरक़्क़ी उर्दू चे जिल्हाध्यक्ष सय्यद हसीन अख्तर यांनी मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले.


0 टिप्पण्या