Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या जिवंत ताराचे स्पर्शाने २ नर अस्वलांचा मृत्यू


• वनरक्षक बीट रामपुरी शेतशिवारातील घटना 


• वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी
मो.95459 14324


भंडारा :- लाखनी  येथील वन परिक्षेत्र अधिकारी तथा सहवनक्षेत्राचे अधिनस्त वनरक्षक बीट रामपुरी येथे वनक्षेत्रालगत असलेल्या शेतशिवारात २ नर अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याची घटना रविवारी(ता.१८) सकाळचे सुमारास उघडकीस आली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पशुधन विकास अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांनी विद्युत प्रवाहाने शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्याने या परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसते. या घटनेबाबद कोणाला काही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा विभागीय कार्यालय भंडारा येथे येऊन देण्याचे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांनी केले आहे. 
              वन परिक्षेत्र तथा सहवनक्षेत्र लाखनी चे अधिनस्त वनरक्षक बीट रामपुरी मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्याती प्राप्त आहे. यात मौल्यवान वनसंपदेसह फळ झाडे व वनस्पती औषधी आहेत. तसेच बिबट, अस्वल, लांडगा, कोल्हा या सारख्या हिंस्त्र श्वापदांसह हरीण, मृग, रानडुक्कर, सांबर, घोडेनिल या सारखे तृणभक्षी प्राणी तसेच साप, विंचू, घोरपड, सरडा हे सरपटणारे प्राणी रंगीबेरंगी फुलपाखरे या वनाचे वैभव असले तरी १० वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या वनक्षेत्राचे संरक्षणाची जबाबदारी क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षकावर आहे. मनुष्यबळाअभावी वनक्षेत्राचे संरक्षण अशक्यप्राय बाब आहे. वनक्षेत्रालगत खासगी शेतजमीन असल्याने दुबार तिबार पिके घेता यावे. यासाठी सिंचन सोय करण्यात आल्याने वीज पुरवठाही केला गेला आहे. 
             या परिसरात काही शेतकऱ्यांची रोवणी सुरू असल्यामुळे काही शेतकरी सकाळीच शेतावर गेले असता वनक्षेत्रालगत असलेल्या श्रीराम गायधने रामपुरी गट क्रमांक ४४५/२ व राजकुमार कोडापे रामपुरी यांचे गट क्रमांक ४७८ मध्ये २ नर अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले आणि वनरक्षक बोरकर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना कळवून क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले, मुरमाडी चे वनरक्षक अश्विनी रंगारी, लाखनी च्या वनरक्षक त्रिवेणी गायधने, गडेगाव च्या वनरक्षक मंगला शहारे, वनरक्षक नितीन उशीर, सचिन राणे, कोदाने, कावळे, वनमजूर तूपट, यादोराव लांजेवार, दुधराम शेंडे, सर्पमित्र मयूर गायधने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता खासगी शेतात २ नर अस्वल मृतावस्थेत आढळून आले. सर्व सोपस्कार पार पाडून पालांदूर च्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांना शव परिक्षणाकरिता पाचारण करण्यात आले. त्यांनी अस्वलाचे परीक्षण करून विद्युत प्रवाहाचे साहाय्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविला आहे.  
              भंडारा वन विभागातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी विद्युत प्रवाहाचा वापर करू नये. सदर घटनेबाबद कोणाला काही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा विभागीय कार्यालय भंडारा येथे प्रत्यक्ष येऊन माहिती द्यावी. प्राथमिक रित्या विद्युत प्रवाहाने शिकार झाली असल्याची शक्यता असल्याने वन्यजीव अपराध दाखल करण्यात आले असून उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या