Ticker

6/recent/ticker-posts

गडेगाव येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

• ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:-लाखनी शहरालगत असलेल्या गडेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) लगत शेतशिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना रविवारी(ता.५) सकाळी ९:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतक ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असले तरी शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. 
                  गडेगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत शेतशिवार असून परिसरात विरळ आणि मोजकेच घरे असून याच परिसरात बासमती राइस मिल आहे. या शेतशिवारात ३० ते ३५ वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह असल्याची माहिती घरालगत असलेल्या नागरिकांना मिळाली. त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरून लाखनी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलिस हवालदार नीरज साबळे, पोलिस नायक राजेश बांते, चालक पोलिस हवालदार लोकेश ढोक घटनास्थळी गेले. मृतदेहाचे निरीक्षण करून पंचनामा करण्यात आला. तथा मृतदेह शितगृहात पाठविण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले तरी या घटनेबाबद माहिती होताच गावकऱ्यांत शंका-कुशंका पेव फुटले आहे. 

असे आहे मृत इसमाचे वर्णन

मृतकाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाची शांडो बनियान व निळ्या रंगाचा फुल पँट घातलेला आहे. अशा वर्णनाच्या मृत व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड अथवा लाखनी पोलिसांशी संपर्क साधावा. असे लाखनी पोलिसांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या