रवी भोंगाने साकोली
साकोली:-दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात मचानावर बसून पानवट्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जातात. त्यांच्या पाऊलखुणा यांची नोंद घेऊन वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज काढला जात असतो. मात्र या उपक्रमाला वन खात्याकडून व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याने मचान उपक्रमाला बगल मिळून मुळ उद्देशच भरकटल्याचे दिसून येत आहे. जंगल आणि वन्यप्राणी गणण्याची वैज्ञानिक पद्धती अस्तित्वात येण्यापूर्वी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात मचानावर बसून पानवट्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जात होत्या. तसेच त्यांच्या पाऊलखुणा, विष्ठा यांची नोंद घेऊन त्यावर वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज काढला जात होता. गणनेची वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात आल्यानंतर वन्यप्राणी गणण्याची जुनी पद्धत बंद झाली. लोकांमध्ये वन्यप्राणी आणि जंगलाविषयी जनजागृती व्हावी म्हणून त्याला मचान उपक्रमाचे स्वरूप देण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम मूळ उद्देशापासून भरघटला असून त्याला व्यावसायिक स्वरूप आलेले आहे. मचानावर बसून प्राणी बघण्यासाठी आता थेट २ ते ४ हजार रुपये आकारले जात आहेत. या शुल्कात व्याघ्र प्रकल्पाकडून प्रकाशित केली जाणारी पुस्तके, टोपी, टी-शर्ट दिले जाते जे अनेकांना नको असते. या उपक्रमाला वन खात्याने " निसर्गानुभव " असे साजेशे नाव दिले. प्रत्यक्षात " निसर्गानुभव" हा उपक्रम निसर्ग पर्यटन मंडळांनी प्रायोगिक तत्त्वावर राबविलेला होता. यात जंगला लगतच्या गावांच्या आश्रम शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेतले जात होते. जंगल आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी ही पिढी तयार व्हावी म्हणून त्यांना प्रत्यक्षात जंगलाची ओळख करून दिली जात होती. मात्र वन खात्याने या उपक्रमाचे व्यावसायिकरण केल्याने पर्यटकांवर अधिकचा बोजा पडत आहे जे सर्वसामान्य पर्यटकांना शक्य नाही. परिणामी पर्यटक प्रेमी वन्यप्राणी अभ्यासक जंगलापासून दूर जाऊ लागले आहेत. सदर खात्याच्या व्यावसायिक कारणामुळे मचान उपक्रमांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येते.


0 टिप्पण्या