Ticker

6/recent/ticker-posts

बनावट ७/१२ तयार करून शेतकऱ्यांचे नावे बोनसची उचल..!

• पिंपळगाव/सडक धान खरेदी केंद्रावरील प्रकार 

• ६ लक्ष रुपये उचल झाल्याचा प्राथमिक अंदाज

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- धान उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्पादित मालास योग्य भाव मिळावा. या करिता शासन प्रयत्नशील असून उपअभिकर्ता स्वयंसेवी संस्थांचे मार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे माध्यमातून धान उत्पादकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असले तरी "कुंपणच शेत खाते" या प्रमाणे स्वयंसेवी संस्थेत कार्यरत संगणक परिचालकाकडून बोगस ७/१२ चे आधारे २५ शेतकऱ्यांचे नावे बोनसची रक्कम उचल केल्याचा अफलातून प्रकार दी. सहकारी राइस मिल पिंपळगाव/सडक येथे उघडकीस आला असून ६ लक्ष रुपये रकमेची उचल झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्हा पणन अधिकारी काय कारवाई करतात. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
                   जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पीक धान असून खाजगी व्यापाऱ्यांकडून समर्थन मुल्याने(हमीभाव) धान खरेदी न करता धान उत्पादकांची लूट केली जात असे. ही बाब शासनाचे निदर्शनास येताच स्वयंसेवी संस्थांची उपअभिकर्ता म्हणून नेमणूक करून त्यांचे मार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविण्यास खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये दी. सहकारी राइस मिल पिंपळगाव/सडक यांना परवानगी देण्यात आली होती. यावर देखरेख व सनियंत्रणाचे काम जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा यांचेकडे सोपविण्यात आले होते. ऑनलाईन पध्दतीने शेतकरी नोंदणी करायची असल्यामुळे या संस्थेने २ संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली होती. 
                     ज्यांचे नावाने शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचा नमुना ८अ, ७/१२, ओळख म्हणून आधार कार्ड व बँकेची पासबुक ज्या शेतकऱ्यांकडे आहे. त्यांची नोंदणी केली जात असे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी त्यामुळे धान उत्पादकांवर कर्ज बाजारी होण्याची पाळी आली आहे. यावर मात करता यावी या करिता राज्य शासनाने २ हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत २० हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे बोनस देण्याचे जाहीर केले. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली असेल अशा सर्वच शेतकऱ्यांना या बोनस रकमेचा लाभ देण्यात येणार होता. मात्र दी. सहकारी राइस मिल पिंपळगाव/सडक या  उपअभिकर्ता स्वयंसेवी संस्थेत संगणक परिचालकांनी संगनमताने संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या काही गावातील ज्या व्यक्तींकडे शेतजमीनच नाही. अशा व्यक्तींचे नावे बोगस ७/१२ तयार करून ऑनलाईन करण्यात आला. या बोगस ७/१२ चे आधारे बोनसची रक्कमही संबंधितांचे बँक खात्यात जमा झाली. पिंपळगाव/सडक धान खरेदी केंद्रात बोगस लाभार्थ्यांची संख्या २५ असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 
                  बोगस ७/१२ संगणकाने एक्सेप्ट केलेच कसे ? हा संशोधनाचा विषय असून हे ७/१२ या संगणक परिचालकांनी तयार केले कसे. तलाठ्यांनी ७/१२ उपलब्ध केला नाही. तर हे डूप्लीकेट ७/१२ आले कुठून हा संशोधनाचा विषय झाला आहे. बोगस ७/१२ वरील शेतकऱ्यांच्या नावाने लक्षावधी रुपयाची उचल झाली असल्याचे दी. सहकारी राइस मिल पिंपळगाव/सडक येथे उघडकीस आल्याने या उपअभिकर्ता संस्थेच्या संचालक मंडळाने नुकतीच मासिक सभा घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त असून या संगणक परिचालकावर कारवाई करणार असल्याचे समजते. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंजूर सर्वच धान खरेदी केंद्राची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात असून या नियमबाह्य प्रकाराची जिल्हा पणन अधिकारी चौकशी करून काय कारवाई करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दी. सहकारी राइस मिल पिंपळगाव/सडक येथे काय प्रकार झाला. या बाबद प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यवस्थापक तथा ग्रेडर दिलीप बुराडे यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. 


प्रतिक्रिया
योगराज आत्माराम तागडे, नेपाल योगराज तागडे, गीता योगराज तागडे, सोपान पतीराम वनवे, दिपाली सोपान वनवे, संदीप चिंतामण राऊत हे सर्व मौजा मोगरा, तलाठी साझा क्रमांक २६ शिवणी, तालुका लाखनी येथील रहिवासी असून त्यांचेकडे शेतजमीन नाही. त्यामुळे त्यांचा तलाठी कार्यालयात ७/१२ उपलब्ध नाही. 

योगराज डांबरे, तलाठी साझा क्रमांक २६ शिवणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या