Ticker

6/recent/ticker-posts

लाखनीत दमदार पावसाची हजेरी

• पेरणीस सुरुवात होणार, शेतकरी सुखावला

• उकाड्यापासून सुटका

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:-  रोहिणी नक्षत्र कोरडा गेला  मृगात १९ जून रोजी दुपारचे सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. पण पावसाने दडी मारल्याने पऱ्हे(रोपे) करण्याचे मार्गावर असताना अचानक शुक्रवार(ता.२८जून) रोजी सकाळचे सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने पऱ्ह्याना संजीवनी मिळाली असून पावसामुळे उन्हाची दाहकता कमी झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत.  
                           खरीप हंगाम २०२३ मध्ये धान उत्पादक शेतकरी मागील खरीप हंगामात काय झाले हे विसरून यावर्षी चांगले पीक पाणी येईल. या आशेने पेरणी पूर्व मशागतीच्या कामास लागला. नंतर रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली तोही कोरडाच गेला. त्यानंतर मृगही संपण्याचे मार्गावर असला तरी धान उत्पादक पेरणी करिता पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. वरुणराजा बरसावा यासाठी अनेक गावात नानाविध उपाययोजना करण्यात आल्या. अखेर दमदार पावसाने पेरणी त्यानंतरी रोवणीही झाली. पण धान परिपक्व होण्याचे मार्गावर असताना अचानक धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
                      लाखनी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२४ मध्ये २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार असून २१ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ६९८ हेक्टर क्षेत्रात आवात्या धानाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मृग नक्षत्रात १९ जून रोजी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण तब्बल आठवडाभर पाऊस आला नाही. त्यामुळे उंकुरलेले धान करपण्याच्या मार्गावर असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला होता. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली होती. पण अचानक शुक्रवारी सकाळचे सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणातील उन्हाची दाहकता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता सुखावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या