Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता डागडुजी करिता नगर परिषदेचे दुर्लक्ष

 • राजीव गांधी चौक ते खान मॅरेज हॉल ते खात रोड रस्त्यावरील प्रकार

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शहरात वर्दळीचा रस्ता म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या राजीव गांधी चौक-खान मॅरेज हॉल ते खात रोड या रस्त्याचे बांधकाम व ३ वर्षे देखभाल दुरुस्ती श्री. आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा कडे असताना मागील वर्षभरापासून ठिकठिकाणी खड्डे पडले असले तरी डागडुजी कडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरून आवागमन करणाऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागतो. नगर परिषदेने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून सदर रस्त्याची डागडुजी करावी. अशी या परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.  
                  राजीव गांधी चौक, खान मॅरेज हॉल ते खात रोड ह्या रस्त्यावर अनेक शिकवणी वर्ग व दवाखाने आहेत. तसेच या रस्त्याचा वापर खात रोडकडे येणारे वाहन चालक शॉर्ट कट म्हणून करतात. पण या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे आवागमन करणाऱ्या दुचाकी चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी चालकांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून अनेक अपघात घडले होते. त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. तर काहींना अपंगत्वही आले. नगर परिषद भंडारा येथील प्रभाग क्रमांक ८ मधील जनतेच्या मागणी वरून नागरी मूलभूत सुविधा अंतर्गत रस्ता डांबरीकरण, पेव्हींग ब्लॉक व बंदिस्त सिमेंट काँक्रिट नाली बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. अंदाजपत्रकिय रक्कम १ कोटी ४३ लाख ६३ हजार रुपये होती. ई-निविदा पद्धतीने या रस्त्याचे बांधकामाचे कंत्राट श्री. आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा यांना देण्यात आले होते. यावर तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीचे काम भंडारा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ च्या कनिष्ठ अभियंत्याकडे सोपविण्यात आले. या रस्त्याचे बांधकाम व बांधकामावर ३ वर्षे देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडेच असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 
            राजीव गांधी चौक, खान मॅरेज हॉल ते खात रोड ह्या रस्त्याचे बांधकाम करतांना रस्त्यावरील वजनदार व्यक्तीचे अतिक्रमण न हटविता काही ठिकाणाहून रस्ता अरुंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहन ओव्हरटेक करतांना अडचणीचे ठरते. त्याच प्रमाणे कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याच्या अर्थपूर्ण संबंधामुळे साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करण्यात आल्याने बांधकाम निकृष्ट झाले असल्याने वर्षभरातच या रस्त्यावर खड्डे पडणे सुरू झाले होते. देखभाल दुरुस्ती कंत्राटदराकडेच असतांनाही रस्ता दुरुस्तीकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रभाग क्रमांक ८ मधील जनतेचे म्हणणे आहे. डांबरीकरणानंतर ३ वर्षे दुरुस्तीचे काम येत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. पण राजीव गांधी चौक-खान मॅरेज हॉल ते खात रोड या रस्त्यावर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या