Ticker

6/recent/ticker-posts

वसुंधरेच्या शेत शिवारात गुंजणार " पेरते व्हा " चे सुर

रवी भोंगाने साकोली 
साकोली:- मृग नक्षत्राला नेहमीप्रमाणे प्रारंभ झाला. नेहमीप्रमाणेच या नक्षत्राने हुलकावणी दिली. मुळातच नक्षत्रच नक्षत्र प्रमाणे बदलत असल्याने सर्वांचे अंदाज फोल ठरतात. मृग नक्षत्रापासून कामाला लागलेला शेतकरी मशागतिकडे वळतो. मुळातच " पेरते व्हा " चे सूर ऐकण्यासाठी. उशिरा का होईना तालुक्यात ब्रेक के बाद म्हणत पावसाने हजेरी लावली. उकड्यापासून कासाविस झालेली जनता शांत झाली. दुसरीकडे वसुंधरेच्या शेत शिवारात "पेरते व्हा" चे स्वर गुंजन करू लागलेत. ग्रीष्म संपला की मृग नक्षत्राला प्रारंभ होतो. त्या आधी शेत शिवारात मृगाचा पाऊस बरसेल तेव्हा बरसेल पण त्याआधी ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाला लागतो. शेतीची मशागत करणे, धुरे ठीकठाक करणे, बी-बियांची जमवाजमव करून शेतीच्या कामाच्या दरम्यान लागणारे सर्व साहित्य गोळा करीत असतो. जेणेकरून एकदा का पाऊस सुरू झाला की मग धावपळ नको. त्यानंतर शेतकरी शेतीच्या कामाचे पूर्ण नियोजन करून  पेरणी करेपर्यंत कमालिचा रिलॅक्स झाल्याचे दिसून येतो. यापूर्वी शेत शिवारात  नजर टाकल्यास पिवळे धम्म ऊन्ह दिसून येत होते, तर दुसरीकडे घसा कोरडा पडत होता. उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य जनतेची ग्रीष्माने दमछाक करून टाकली होती. परंतु आकाशात आता ढग दाटून येत असल्याने सर्वत्र हळूहळू हिरवळ जाणवू लागली आहे. शेत शिवारात हिरवाईने आता नवा शालू परिधान केलेला आहे.अशा वातावरणात  " पेरते व्हा " चे स्वर शेत शिवारात ऐकू यायला लागले आहेत. या वातावरणात वयोवृद्धासह , आणि बाल बच्चे मंडळी देखील पावसाचा आनंद घेण्यासाठी रमलेले आहेत. एकंदरीतच वसुंधरेच्या शेत शिवारात " पेरते व्हा " च्या स्वराने सर्वानाच कामाला लावले एवढे मात्र खरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या