मुख्याध्यापिका वंदना पोहाणे सेवानिवृत्त
दखल एका सेवानिवृत्ती
रवी भोंगाने साकोली
साकोली :-मुख्याध्यापिका वंदना पोहाणे ह्या ३० जून २०२४ रोजी टिळक विद्यालय खंडाळा येथून सेवानिवृत्त होत आहेत. नोकरी म्हटली की नियतमानानुसार प्रत्येकालाच सेवानिवृत्त व्हावे लागते. यात नाविन्य काहीच नाही. परंतु काहींच्या सेवानिवृत्तीची दखल घ्यावी लागते. त्यांचे कारण असे, कधी कधी अफाट कर्तृत्व असून देखील कर्तव्य बजावतांना समाजासमोर येत नाही. ते झाकोळलेले असते. म्हणूनच मुख्याध्यापिका वंदनाताई पोहाणे यांची सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दखल घ्यावीशी वाटली. मागील वर्षीच त्यांना शामरावबापू कापगते प्रतिष्ठान तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका वंदना पोहाणे मूळच्या वंदना लक्ष्मणराव बावनकर. लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) हे त्यांचे मूळ गाव म्हणजेच माहेर. आई शिला आणि वडील लक्ष्मणराव बावनकर यांच्या परिवारातील वंदनाताई मोठ्या भगिनी. त्यांचे शालेय शिक्षण मूळ गावी म्हणजे शिवनी आणि त्यानंतर राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे झाले. त्यानंतर समर्थ महाविद्यालय लाखनी येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीएडचे शिक्षण शासकीय शिक्षण महाविद्यालय भंडारा येथून पूर्ण केले. दरम्यान त्यांनी एम. ए. पूर्ण केले. त्यानंतर त्या साकोली येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्यात. १९८९ ते १९९१ अशी सुरुवातीचे दोन वर्ष आताचे नंदलाल पाटील कापगते विद्यालयात घालविल्यानंतर त्या साकोली तालुक्यातील खंडाळा ( बोंडे ) येथील टिळक विद्यालयात स्थिरावल्यात. सलग ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर त्या सेवानिवृत्त होत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचा संसार गुलाबराव पोहाणे यांच्याशी सुरू झाला. आयुष्य म्हटलं की घडामोडी, चढ-उतार अशा काही गोष्टी ठरलेल्या असतात. पण त्यातून एक संयमीपणा, सहनशीलता किती आणि कशी असावी हा मोठा गुण त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग राहिलेला आहे. या परिवाराशी आमचे कौटुंबिक नाते असल्याने स्वभावातील संयंमीपणा आणि सहनशीलता आम्ही अगदी जवळून बघितलेली आहे. याही पलीकडे कुठलाही आड पडदा न ठेवता रोखठोक बोलणे हा त्यांच्या स्वभावातला दुसरा गुण. सहनशीलता आणि संयमितपणा किती असावा याचे एकमेव उदाहरण द्यायचे तर ते वंदनाताईचे. सहनशीलता आणि संयमीपणा याचे आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे वंदनाताई. शैक्षणिक सेवा देतांना त्यांनी संसाराचा गाडा उत्तम सांभाळला. त्यांना दोन अपत्य. डॉ.अक्षय हा दंतचिकित्सक तर अभय फार्मसीचे पदवी शिक्षण पूर्ण करून यूपीएससी परीक्षेत तयारी करीत आहे. धार्मिक कुटुंबात जन्म घेतलेल्या वंदनाताईंनी आई-वडिलांकडून संस्कार आणि शिस्तीचे धडे घेतले. मुलींनी शिक्षण घ्यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे असा प्रयत्न त्यांच्या आई-वडिलाकडून नेहमीच राहिला. वंदना ताईच्या दोन भगिनी देखील उच्चशिक्षित आहेत. लहानपणी आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार त्यांच्या पुढील आयुष्यात उतरलेत. ते संस्कार आता अक्षय आणि अभय यांच्यात रूपातही दिसतात. वंदना ताईच्या हाताखाली घडलेली अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. हीच माझ्या उर्वरित आयुष्याची शिदोरी असे त्या म्हणतात. सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्यांचे पुढील आयुष्य कुशल,मंगल , सुदृढ, निरोगी आणि दीर्घायुषी जाओ अशी सदिच्छा व्यक्त करून पुढील नव्या वाटचालीसाठी त्यांना चित्रा न्यूज चॅनल व आमच्याही परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


0 टिप्पण्या