Ticker

6/recent/ticker-posts

शहरातील उद्यानांचा विकास: प्रशासक श्रीकांत यांची पुढाकार


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-शहरातील नागरिकांना अद्यापही योग्य दर्जाची उद्याने उपलब्ध नसल्याने, प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहराच्या विविध भागात दर्जेदार उद्याने विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना मांडली आहे. सध्या, टीव्ही सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद उद्यान आणि सिडको एन-७ येथील उद्याने नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत.

प्रशासकांच्या संकल्पनेनुसार, एमजीएम परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक, सातारा परिसरातील तीन उद्याने, उल्कानगरी, कॅनॉट गार्डन आणि गारखेडा भागातील उद्याने विकसित केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, उद्यान उभारणीत पश्चिम विधानसभेला झुकते माप देण्यात आले आहे.

शहराची लोकसंख्या १८ लाख असल्याने, शहरात मोठी आणि चांगली उद्याने असणे अत्यावश्यक आहे. सध्या, शहरातील अनेक उद्यानांमध्ये विकास नसल्यामुळे आणि त्यांच्या भकास अवस्थेमुळे नागरिक तिथे जात नाहीत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगली उद्याने असावीत, अशी मागणी प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील वर्षीच केली होती. त्यांनी लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून खेळण्यासाठी मैदानावर आणण्याची संकल्पना मांडली होती.

मागील काही दिवसांमध्ये सिद्धार्थ उद्यानात संगीत कारंजे, इलेक्ट्रिक ट्रेन, एन-७ येथे नौका विहार आणि स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांकडून या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून महापालिकेला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने सात ठिकाणी उद्यानांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. सातारा परिसरातील गट नंबर १६८ मधील दीड एकर जागा, गट नंबर ९२/९३ मधील जागा, गट नंबर १४४ मधील जागेवर उद्याने विकसित होणार आहेत. या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक, मैदान, ओपन जीम, पाण्याची व्यवस्था आणि बसण्यासाठी बाके आदी सुविधा असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील तळ्याचे सुशोभीकरण, सिडको एन-१ मधील कॅनॉट गार्डन, उल्कानगरी भागातील आदित्य नगर उद्यान आणि गारखेडा भागातील सर्व्हे नंबर ५३ मधील उद्यानांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिकेने चार ठिकाणी हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. इटखेडा भागातील गोल्डन सिटी, भावसिंगपुर्यातील पेठे नगर, साकेत नगर आणि सिडको एन-२ मधील कामगार चौक येथील मनपाच्या मोकळ्या जागांवर हरितक्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या