१ लाख रुपयाचे पारितोषिक मिळणार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून घेण्यात आलेल्या "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत" 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानक नागपूर विभागातून प्रथम आल्याने या बसस्थानकाला १ लाख रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. तर साकोली बसस्थानक राज्यात प्रथम आल्याने २५ लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले असल्याचे वाहतूक नियंत्रक श्याम गिरेपुंजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत रा.प. महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर" हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.
ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांची त्या बसस्थानकांवरील प्रवासी फेऱ्यांच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात ब वर्गातून लाखनी बसस्थानक विभागात प्रथम १ लाख रुपये पुरस्कारास तर साकोली बसस्थानक राज्यस्तरावर अव्वल ठरल्याने २५ लाख रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. रा.प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले असून, या अभियानातून "आपलं गाव आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक" ही संकल्पना रा.प. कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रुजविण्यास मदत झाली असल्याचे वाहतूक नियंत्रक श्याम गिरेपुंजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


0 टिप्पण्या