राकेश आसोले चित्रा न्युज
अहमदनगर: बीड जिल्ह्यातील मातोरी गावात ओबीसी कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त गुरुवारी रात्री मातोरी गावातून जाण्याची योजना होती. मात्र, दौऱ्यापूर्वी रात्री काही समाजकंटकांनी ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर अचानक दगडफेक केली.
या हल्ल्यात ओबीसी कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला मार लागला आहे. तसेच, गाड्यांच्या ताफ्यातील वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे.
खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे चौकात ओबीसी समाजाने टायर जाळून समाजकंटकाचा निषेध केला. या घटनेमुळे ओबीसी समाजात रोष पसरला असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
"हा हल्ला अत्यंत भ्याड असून, ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. आम्ही हा हल्ला कधीही सहन करणार नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी."
"समाजकंटकांनी केलेला हा हल्ला आमच्यावर नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजावर आहे. आम्ही एकजूट दाखवून याचा कठोर निषेध करतो आणि दोषींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी करतो."


0 टिप्पण्या