प्रकरण - पोलिस शिपायाच्या अपघाती मृत्यूचे
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- रात्रीच्या वेळी आपले कर्तव्य बजावून स्वत:च्या दुचाकीने रूमवर परत जात असलेल्या अनिल राठोड नामक पोलिस अंमलदाराची दुचाकी चिखलावरून गेल्याने स्लीप होऊन मृत्यू झाला. या आधी लाखांदूर चे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांना आवाहन केले असले तरी चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर चिखल सोडीत खुलेआम धावत असल्याने अशी घटना आणखी कुनासोबतही घडू शकते. त्यामुळे यावर वचक बसावा म्हणून या प्रकरणी "त्या" ट्रॅक्टर चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जनतेकडून मागणी होत आहे.
शनिवारी रात्रीचे सुमारास पोलिस अंमलदार अनिल राठोड हे लाखांदूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना आपले शासकीय कामे आटोपून रात्री 11.30 वाजता दरम्यान आपल्या दुचाकीने रूमवर जाण्यासाठी निघाले. दरम्यान वाटेत किशोर कपडा दुकानासमोर ट्रॅक्टरच्या पडलेल्या चिखलावरून त्यांची दुचाकी जात असतांना एकाएक स्लिप झाल्याने ते रस्त्यावर पडून डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरवर्षी हंगामात लाखांदूर तालुक्यासह इतरही तालुक्यात ट्रॅक्टर चालक हे शेतात चिखलटी करून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखल हा रस्त्यावर येतो. बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो. परिणामी, चिखलाने माखलेल्या रस्त्यावर, कोणतेही वाहन घसरून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टर चालकाच्या अशा चुकांमुळे यापूर्वी सुध्दा अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तर, ६ जुलै रोजी कुठल्याही परिस्थितीत रात्रंदिवस जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यापैकी अनिल राठोड नामक लाखांदूर पोलिस शिपायाचा ट्रॅक्टरच्या चिखलाने घात केला.
विशेष म्हणजे या आधीच साधारणतः १५ दिवसांपूर्वी लाखांदूर चे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांनी ट्रॅक्टर शेतात धुवूनच रस्त्यावर आणावे. असा सल्ला देत चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास कारवाई केली जाणार असल्याची तंबी दिली होती. त्यांच्या सूचनेला न जुमानता चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणणे सुरू आहेत. याचा परिणाम किती भयावह होऊ शकतो हे ६ जुलैच्या घटनेने दाखवून दिले. अशी घटना कुठेही आणि कूनासोबतही होऊ शकते. त्यामुळे लाखांदूर पोलिसांनी "त्या" ट्रॅक्टर चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी जनतेकडून मागणी होत आहे.
तहसीलदाराने काढला मनाई आदेश(चौकट)
रस्त्यावर पडलेल्या चिखलावरून गाडी स्लिप झाल्याने अखेर एक पोलिस शिपाई मृत्यूमुखी पडला. अशी घटना घडू नये. या करिता पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी तहसीलदार वैभव पवार यांच्याशी चर्चा करून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणण्यास मनाई आदेश काढण्याचे सुचविले होते. त्यानुसार तहसीलदार आता मनाई आदेश काढण्यात जुटले असल्याची माहिती लाखांदूर चे तहसीलदार वैभव पवार यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या