Ticker

6/recent/ticker-posts

डोळ्यातील पाऊस तेव्हा हळवा झाला होता.....

रवी भोंगाने साकोली
 साकोली;- पाऊस म्हणजे मनाची हौस, मनाची तगमग. कवी लेखकांचा प्रेरणा स्तंभ. पाऊस म्हणजे बेताल होऊन जगण्याची रीत. पावसाचा चिखल अंग खांद्यावर घेऊन या हृदयाची त्या हृदयाला ऊर्जा जोडणारा पाऊस. असा नटखटपणे वागणारा, वागवणारा वेड लावणारा आणि वेडावणारादेखील. भर पावसात आनंदाचा पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लावणारा हा पाऊस,
" चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरील सांध गोधनी बाई, 
झाकू नको कमळन बाई
 सखे लावण्याच्या खाणी "
 भर पावसात ओले चिंब भिजायला लावणारे हे सारजा मराठी चित्रपटातील गाणे. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजातील हे स्वर हृदयाला भिडणारे. पाऊस म्हणजे काही औरच. तारुण्याच्या उंबरठ्यावर ओल्या चिंब पावसात भिजने न आवडणारा एखादाच भिडू. पावसाचा नैसर्गिक आनंदच वेगळा. टपोऱ्या थेंबाचे ताल धरून अंगणात खेळायला, बागडाला लावणारा. पावसाचे थेंब अलगदपणे अंगावर कधी कधी घेऊ असे सर्वांनाच वाटत असते.अशावेळी एखादी चारोळी मनाचा सूर पकडत असते. 
"आठवणींना घालायचा असतो आवर
 हे वेड्या मनाला कळत नाही 
पावसात येणार नाही तुझी आठवण
 असं मात्र घडत नाही ,"
 तुझ्या आठवणी म्हणजे पावसामध्ये भिजणाऱ्या. भिजता भिजता खोल मनामध्ये रुजणाऱ्या. पाऊस बसत असतो असा अधून मधून. माझेही डोळे  पाणवतात ती संधी साधून. सरीवर सरी कोसळू लागल्या की आठवणींच्या अशा पाऊलखुणा सरसर कोसळणाऱ्या श्रावणसरी सारख्या आठवायला लागतात. मग  पावसाळ्यातील त्या जुन्या आठवणींचा फ्लॅश असा अचानक लख्खपणे पडतो. आठवणींचे गाठोडे अलगदपणे उघडत जाते. तेव्हा काळजावर  कोण वार करतोय हे कळायलाही त्यावेळी मार्ग नसतो.
" माझ्या अंगणात असतो 
 तुझ्या आठवणींचा पाऊस 
 तुझं माझं नातं मात्र
 त्या एकट्यालाच ठाऊक "
आठवणींच्या श्रावणसरी अलवारपणे बरसत जातांना मिलिंद इंगळेचा गारवा आठवणारच आठवणार. त्यातही महाविद्यालयीन जीवनाची पाऊलवाट. महाविद्यालयीन परिसरात सुरू झालेली कुजबूज अशी गारव्यापर्यंत घेऊन जाते. अप्रत्यक्षपणे तिचं छत्री घेऊन येणे आणि त्याचे छत्रीविना पाण्यात भिजनं काही आगळेच असते. अशावेळी महाविद्यालयाची आठवलेली पाऊलवाट भर पावसाळ्यात एक नवीन दुखणं घेऊन येते. ती देखील एखाद्या दुथडी भरून वाहत असलेल्या नदीसारखी भासू लागते. मग एखादी चारोळी सहजपणे कवेत येऊन जाते.
" ढगांचा गडगडाट 
 विजांचा कडकडाट 
 गारठलेल्या संध्याकाळी 
 हिरवी चिंब पायवाट "
 प्रत्येकाचे वयोपरत्वे जगणे आणि जिने वेग वेगळे. ओल्या चिंब पावसात प्रत्येकाचा आनंद उधळण्याचा प्रकार आगळा वेगळा असू शकतो. यात कोणाचेही दुमत नाही. निसर्गाचा हिरवागार शालू असा अंगोपांगी  पांघरलेला असतांना त्याला तिची आणि तिला त्याची आठवण येणारच येणार. अल्लडपणे  खेळणाऱ्या खोडकर पावसाची प्रत्येकालाच प्रतीक्षा असते. पाऊस न आल्याने या आधी कासाविस झालेले मन नंतर मात्र, "मन उधान वाऱ्यानं " म्हणायला लागते. दडून बसलेला पाऊस असा धो धो बरसला की श्वासही थांबतो की काय असे वाटायला लागते. अशावेळी सहज मनात रुंजी घालतात शब्द. " " मनात तुझ्या आठवणींचा
 जेव्हा कालवा झाला,
 डोळ्यातील पाऊस तेव्हा
 जरा हळवा झाला .
 माझ्या अंगणात असतो 
तुझ्या आठवणींचा पाऊस,
 तुझं माझं नातं मात्र
 त्याला एकट्यालाच ठाऊक ".

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या