रवि भोंगाने साकोली
साकोली:-मृग नक्षत्राला ७ जून पासून दरवर्षी प्रारंभ होत असतो.आणि दरवर्षीच मृग नक्षत्र हुलकावणी देत असतो. खरं तर तेव्हापासूनच पावसाला सुरुवात व्हायला पाहिजे होती. परंतु अलीकडे निसर्ग बदलला. कवी मिलिंद इंगळेंच्या कवितेत सांगायचं झालं तर थोडासा बदल करून " दरवर्षी मृग येतं, दरवर्षीच कोरडं जातं, त्याचं माझं भांडण होऊन, लोकांमध्ये हसू होतं " मात्र चक्क जुलै महिन्याच्या मध्यानापासून पावसाने जून महिन्याच्या बॅक लॉक पूर्ण केला. श्रावण मासाच्या प्रारंभा पूर्वीच म्हणजे गत पंधरवड्यात पावसाने दमदार सुरुवात करून श्रावणात वसुंधरेवर हिरवा गालिचा अंथरला. खऱ्या अर्थाने जिवती अमावस्या सणापासून श्रावण मासाला प्रारंभ होत असल्याने प्रसन्नचित्त मनाने महिला आपल्या सणासुदीच्या तयारीला लागल्याचे दिसून येतात. अशातच रिमझिमणारा श्रावण पाऊस सरीसह आनंदाच्या सरी घेऊन येत आहे. मृगात, आषाढात दिसणारी कोरडी ठणठणीत जमीन, अवर्षणाची चिन्हे, बळीराजाच्या चेहऱ्यावरील वेदना श्रावण सरींनी कुठल्या कुठे पळवून लावल्याचे दिसून येत आहेत. अशावेळी बालकवी ठोंबरे यांची श्रावण मासातील कविता न आठवली तरच नवल. " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन्ह पडे " परंतु बाल कवींना त्यावेळी दिसलेला श्रावण आता नाही हे खरे आहे. पण म्हणून कोणी त्याचा आनंद लुटूच नये का? दिवस कितीही बदलले तरी श्रावण येणारच.
तो उन्ह पावसाचा लपंडावाचा खेळ आहे आणि तो खेळणारच. सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशाच्या पडद्यावर उमटणारच. श्रावणाचा देखणा अविष्कार निसर्गात पावलोपावली जाणवत आहे. श्रावणातील पहिला सण म्हणजे दीपपूजा, नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, देशभक्ती वातावरणात स्वातंत्र्याच्या यज्ञात प्राण्यांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना स्मरण करीत असण्याचा हा महिना. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन. त्यानंतर पारशी नववर्ष दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी.अवकाशात कृष्ण मेघांची बरसात असतांनाच घरोघरी घनशाम दाखल होणार. सणांची रेलचेल असलेल्या आनंदी श्रावण मासाची सांगता पोळ्याने होत असते. त्या अगोदर श्रावणाच्या आगमनाने सृष्टीने, वसुंधरेने हिरवा शालू परिधान केला. रानोवणी घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांनी देखील चांगल्या पावसाचा संदेश दिलाच होता. अशावेळी पुन्हा एकदा कवी मंगेश पाडगावकर आठवतात. " श्रावणात घननिळा बरसला, रीमझीम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा ". सिमेंट काँग्रेसच्या जंगलात थोड्याफार प्रमाणात का होईना हिरवळ पसरली. झाडाझुडपांची हिरवी पालवी, रंगीबेरंगी फुले बघून लहान बालके, महिला, आबाल वृद्धांचे डोळे सुखावले. श्रावण मासात महिला व्रत वैकेल्याच्या तयारीला लागतात. अशातच मंगलागौर म्हणजे नववधूसाठी खास उत्सव. झाडीपट्टीच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात हा उत्सव साजरा होत नसला तरी नागपूर वर्धा व तिकडच्या प्रांतात मंगळागौर उत्साहात साजरी केली जाते. दुसरीकडे श्रावण मास नेहमी शाकाहारी महिना म्हणून ओळखला जातो.या महिन्यात बहुतांश घरी मासांहारी आहार वर्ज्य असतो. या महिन्यात ढगाळ वातावरण रोगराईला पोषक असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक जण मासाहारांपासून दूर राहतात. श्रावण मासात सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो तर खऱ्या अर्थाने प्रेमाचा गुलमोहर बहरतो. पावसाच्या साथीने श्रावणात त्या आठवणी उरी कवटाळतात. श्रावणातील रिमझिम अशी अंगावर रोमांच निर्माण करीत असते. अशा आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात गर्दी करीत असताना हलकीशी सर अंतर्मनावर शिडकावा करून जात असते. " श्रावण सर बाहेरी, मी अंतरी भिजलेला, पंखी खूपसून चोच, एक पक्षी निजलेला ". या ओळी बरेच काही सांगून जातात. निसर्ग एक जीवन जगण्याची मधुशाळा आहे. एक प्रार्थना आहे. नव्हे ती एक आराधना आहे. असेच तुमच्या आमच्या आयुष्यात हिरवी स्वप्ने पेरणारा, सुखद फुले उधळणारा सर्वांना हवा हवासा वाटणाऱ्या श्रावणांचे स्वागत करू या.


0 टिप्पण्या