दिक्षा पाटील चित्रा न्युज
सोलापूर : महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण नेत्यांपैकी एक, खासदार प्रणिती शिंदे यांनी आज गोकुळाष्टमी निमित्ताने महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, आणि शिंदे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
शिंदे म्हणाल्या, "आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उध्वस्त होत आहे. हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही."या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारवर जोरदार टीका करत शिंदे यांनी म्हटले, "सरकारचं 3600 कोटींचे मोठे स्कॅम आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला आहे, परंतु ही केवळ दिशाभूल करणारी वक्तव्ये आहेत."
या पुतळ्याचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, आणि आता या पुतळ्याची अशी अवस्था झाल्याचे शिंदे यांनी गंभीरपणे घेतले आहे. "वरून फक्त शो आणि आत मधून पोकळ असणारे हे सरकार आहे," असे त्यांनी सांगितले.शिंदे यांनी आरोप केला की सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला याबाबत त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.


0 टिप्पण्या