मुख्याध्यापक राजेश ढूमणेंवर पोलिस कारवाई करा - दिलीप नैताम यांची मागणी
प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर : : उच्च न्यायालय आणि शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असतानाही एका आदिवासी सहाय्यक शिक्षकाला सेवेत रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहोली (मो.) येथील संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडून सलग होणाऱ्या अन्यायाविरोधात पीडित शिक्षकाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल करून दाद मागितली आहे.
तक्रारदार शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गडचिरोली यांनी त्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, असे असतानाही त्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात येत असून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.
याशिवाय, शिक्षकाच्या अनुपस्थितीत इतर व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे व ठराव सादर करून बेकायदेशीररीत्या 'शालार्थ आयडी' तयार करण्यात आला आणि त्याद्वारे शासनाच्या तिजोरीतून नियमित वेतनाची उचल करून आर्थिक घोटाळा केला जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
या सततच्या नकारामुळे तक्रारदार शिक्षकाला भीषण आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि न्यायालयीन लढ्याचा खर्च यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली असून त्यांना प्रचंड मानसिक व कौटुंबिक तणावातून जावे लागत आहे. सेवेत रुजू न करून घेतल्याने आणि झालेल्या छळामुळे आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत, आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या गंभीर प्रकरणाची प्रत दखल आणि आवश्यक कारवाईसाठी उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गडचिरोलीचे सहपालकमंत्री, सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), विभागीय आयुक्त (पुणे), पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), शिक्षण सहसंचालक, माजी व सध्याचे शिक्षक आमदार, तसेच स्थानिक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
या शाळेतील हेकेखोर मुख्याध्यापक राजेश ढूमणे यांच्यावर तात्काळ पोलीस कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप नैताम यांनी केली आहे.
तसेच इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. "जो पर्यंत त्या शिक्षकाला योग्य न्याय मिळणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही," असे समर्थ यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या