संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर :-बार्शी तालुका पोलीस स्टेशनने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक एकात्मता आणि शांतता अबाधित राखण्यासाठी 'एक गाव, एक गणपती' ही अभिनव संकल्पना राबविण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने, आज सकाळी अकरा वाजता बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या परिसरात गणपती मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जाती, धर्म, भाषा, आणि वंश एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले. या संकल्पनेचा उद्देश गावातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आहे. एकच गणपती साजरा केल्याने गावातील एकात्मता आणि एकोपा वाढेल, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळता येईल.
बैठकीत पोलीस प्रशासनाने या संकल्पनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा आग्रह धरला. विशेषतः, रक्तदान शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच इतर समाजोपयोगी कार्ये हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि समाजहितकारी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष आणि सदस्यांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, गावपातळीवर शांतता कमिटी आणि तंटामुक्त समितीच्या बैठका आयोजित करून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या या पुढाकारामुळे सामाजिक सलोखा वाढेल आणि गणेशोत्सव सण अधिक सुरक्षित आणि एकात्मतेने साजरा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या