Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यात १७ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रातील रोवणी पूर्ण

• तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालाची माहिती 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील खरीप हंगाम २०२४ मध्ये मृग नक्षत्राचा शेवट व आद्रा नक्षत्राची सुरुवात पावसाने झाली. त्यानंतर पावसाने उसंत दिल्याने २२ हजार २३६.७० हेक्टर क्षेत्रात नर्सरी तर ८९३.३० हेक्टर क्षेत्रात आवत्या असा एकूण २३ हजार २५४ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. त्या नंतर १९ ते २९ जुलै दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत १७ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली असून शेकडा प्रमाण ८३ टक्के असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालात नमूद आहे. 
                      तालुक्यात मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे धान उत्पादकांना नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी तयार केल्या तर सधन शेतकऱ्यांनी शेतात खासगी बोअरवेलची व्यवस्था केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रोहिणी नक्षत्र कोरडा गेला असला तरी मृग नक्षत्राचे शेवटी व आद्रा नक्षत्राची सुरुवात पावसाने झाल्याने पुष्य नक्षत्रापर्यंत पेरणी जवळपास आटोपण्याचे मार्गावर होती. 
                    साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. त्यात पिंपळगाव, पालांदुर, पोहरा, लाखनी व मुरमाडी हे ५ महसूल मंडळ असून भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ०६९ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०८ हेक्टर असून अन्यधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, मसाला पिके, ऊस, फळबाग व चारा पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगाम २०२४ मध्ये ५ ऑगस्ट पर्यंत पर्यंत पऱ्हे(नर्सरी) २२ हजार ३६०.७० हेक्टर क्षेत्रात आणि आवत्या ८४७.३० हेक्टर क्षेत्रात अशी एकूण २३ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी तसेच १७ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रात रोवणी पूर्ण करण्यात आली  या शिवाय तूर ९५४.८५ हेक्टर, गळीत धान्य १.२० हेक्टर, मिरची ५.७० हेक्टर, आले २.३० हेक्टर, हळद ४.९५ हेक्टर, वांगी ४४.६५ हेक्टर, टोमॅटो १.५० हेक्टर, भेंडी ३४.९० हेक्टर, चवळी ५१ हेक्टर, कारले ३५.२५ हेक्टर, लवकी २.३० हेक्टर, दोडके ७.३० हेक्टर, कोहळे ०.७० हेक्टर, वाल १.५० हेक्टर, इतर भाजीपाला १४.२५ हेक्टर एकूण भाजीपाला १९३.३५ हेक्टर, ऊस ७.१० हेक्टर तसेच इतर पिके १.४० हेक्टर क्षेत्र, एकूण पेरणी क्षेत्र २० हजार १.६५ हेक्टर असून टक्केवारी ८३.१० टक्के असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालात नमूद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या