Ticker

6/recent/ticker-posts

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात तिकिटासाठी घमासान

• सर्वच राजकीय पक्षात अनेक इच्छुक 

• तिकिटासाठी काही पक्षांतर करणार

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- राइस सिटी म्हणून सुविख्यात असलेल्या तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात मागील विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली होती. पण २०२४ चे विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले असून महाविकास आघाडी व महायुतीचे बॅनर खाली निवडणूक लढविली जाणार असल्यामुळे ज्या घटकपक्षाचे वाट्याला तिकीट येईल. त्याचे चांगलंभलं तर इतरांचा हिरमोड होणार आहे. या प्रकाराने निवडणूक काळात अनेकांकडून पक्षांतर होण्याची किंवा स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात वनसंपदा, पाणी, खनिजसंपदा व कच्चा माल उपलब्ध असताना एमआयडीसी तील अनेक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झालेले आहेत. शतीही साथ देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणारा तसेच बंद झालेले उद्योग धंदे सुरू करण्याची हमी देणाऱ्या उमेदवारास मतदारांकडून पसंती दर्शवण्यात येत असल्यामुळे आपल्यालाच तकिक्त मिळावी. या करिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या गॉडफादर मार्गे पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केल्यामुळे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात तिकिटासाठी घमासान होणार असल्याचे चित्र दिसत आहे. 
                         २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे समविचारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होऊन सरकार स्थापन केली जाईल. असे वाटत असताना मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षात बिनसल्याने युती झाली नाही. मुदतीत सरकार स्थापन झाले नसल्यामुळे काही कालावधीसाठी राष्ट्रपती शासन लागू करावे लागले. राजकारणातील चाणक्य अशी बिरुदावली असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेऊन भिन्न विचारधारा असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट बांधून महाविकास आघाडी स्थापन केली. तथा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात सरकार स्थापन केले. पण सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या पक्षाला सरकार स्थापन न केल्याने शल्य बोचत राहिले. सरकार स्थापनेसाठी कुरापती सुरू केल्या संधीचे शोधात असताना २ ते अडीच वर्षानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस घटकपक्ष असलेल्या महायुतीचे सरकार राज्यात स्थापन केले. तर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) ही महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे. 
                          तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गात मोडत असून मतदार संख्या ३ लाख १ हजार ९४३ तर बूथ संख्या ३४८ आहे. या क्षेत्रात तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश असून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे या मतदार संख्या प्रतिनिधित्व करीत आहेत. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस तर महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) यांचेसह माजी आमदार चरण वाघमारे यांना मानणारा वर्ग आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र मध्यप्रदेश चे सीमेवर असून मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र, प्रवाहित होणाऱ्या वैनगंगा, बावनथडी व सुर नद्या, खनिज संपत्तीचे भंडारा विपुल प्रमाणात आहे. उद्योगांसाठी आवश्यक तो कच्चा माल तसेच वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग व सडक मार्ग उपलब्ध आहे. पण एमआयडीसी तील अनेक उद्योग धंदे बंद पडले असून हे सुरू आहेत. ते अखेरच्या घटका मोजत असले तरी या क्षेत्रातील राजकारण्यांनी उद्योगांना संजीवनी देण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो मजूर बेरोजगार झाले आहेत. 
                         विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने तिकिटासाठी इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे. पण तिकीट कोणत्या घटकपक्षाला मिळेल याची शाश्वती नाही. विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे असले गरी भाजपाने आपली दावेदारी सोडली नाही, खासदार अमोल कोल्हे यांनी तुमसर मध्ये शिवस्वराज यात्रेची सभा घेऊन महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटही शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. तर माजी आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा परिषद भंडारा मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी तसेच लोकसभा निवडणूक काँग्रेस ला सहकार्य केल्याने प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ऐनवेळी उपकाराची परतफेड करू शकतात. तर शिवसेनाही मागे नाही. त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्षही निवडणुकीत रंगत आणू शकतो. त्यामुळे सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात तिकिटासाठी घमासान होणार आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

हे आहेत इच्छुक उमेदवार


काँग्रेस :-देवा इलमे, रमेश पारधी, राजेश हटवार, अनिल बावनकर, प्रमोद तीतीरमारे, खेमराज पंचबुद्धे.

भाजपा :-प्रदीप पडोळे, राजेंद्र पटले, विनोद तुमसरे, हरेंद्र राहांगडाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) :- आ. राजू कारेमोरे, रीता हलमारे.


राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) :- किरण अतकरी, नरेश ईश्वरकर, मधुकर कुकडे, ठाकचंद मुंगुलमारे.

अपक्ष :- चरण वाघमारे.
या शिवाय शिवसेना वंचित बहुजन आघाडी व बसपा इच्छुक उमेदवारांची नावे कळू शकली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या