• किटाडी येथील घटना
• गावकऱ्यांत भीतीचे वातावरण
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- मध्यरात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने गोठ्यात शिरून शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यात १ बोकड ठार तर १ शेळी जखमी झाल्याची घटना शनिवारी(ता.२३ नोव्हेंबर) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास किटाडी येथे उघडकीस आली. क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांचे मार्गदर्शनात वनरक्षक मंगला शहारे यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव गोकुळ भोयर, रा. किटाडी, तालुका लाखनी असे आहे. या घटनेमुळे पशुपालकांसह गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधीही या गावातील जर्सी गाय पट्टेदार वाघाने ठार केली होती. हे विशेष.
धान शेती परवडेनासी झाल्यामुळे धान उत्पादक शेतकरी पशू पालनाकडे वळला आहे. काही शेतकऱ्यांनी शेळ्या तर काहींनी गायी, म्हशी पाळणे सुरू केले आहे. किटाडी येथील अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. गोकुळ भोयर हे शेळी पालन करीत असून त्यांचेकडे ५ ते ६ शेळ्या व बोकड आहेत. शनिवारी रात्रीचे सुमारास शेळ्या व बोकडांना चारापाणी करून गोठ्यात बांधून भोयर कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पट्टेदार वाघ गावात आला व त्याने गोकुळ भोयर यांचे गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला केला. त्यात १ बोकड जागीच ठार तर १ शेळीला जखमी केले. शेळ्यांच्या गोंगाटाने भोयर कुटुंबीय जागे झाले व गोठ्याकडे जाऊन पाहतात. तर १ बोकड ठार व १ शेळी जखमी झाल्याचे दिसून आले. गोठ्याचे आजूबाजूला पट्टेदार वाघाचे पगमार्क आढळून आल्याने पट्टेदार वाघाने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती वन विभागासह पशुधन विकास अधिकारी पालांदूर यांना देण्यात आली. क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांचे मार्गदर्शनात वनरक्षक मंगला शहारे यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून पालांदूर च्या पशुधन विकास अधिकारी डॉ. नगराळे मॅडम यांना मृत बोकडाचा पंचनामा केला. तर जखमी शेळीवर उपचार केले. १५ हजार रुपयाचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवून मृतक बोकडाला जमिनीत पुरण्याची सूचना केली. या आधीही पट्टेदार वाघाने किटाडी येथील १ गाय ठार केली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 टिप्पण्या