• स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई
• ६ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकिवर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पोलिस नायक अंकुश पुराम पथकासह पट्रोलिंग करीत असताना हिरव्या रंगाचा जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल ३२२१ ने पालांदूर जिल्हा परिषद शाळेजवळ विना परवाना अवैध रेतीची वाहतूक करतांना शुक्रवार(ता.२९ नोव्हेंबर) रोजी सकाळी ८:४५ वाजता मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक/मालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाचे नाव ओमेंद्र श्रावण शिवणकर(२४) रा. ढीवरखेडा, मालकाचे कैलास दौलत ब्राह्मणकर(४५) रा. मरेगाव, तालुका लाखनी असे आहे. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
चुलबंद नदी पात्रातील पळसगाव, विहिरगाव(कन्हाळ्या), मरेगाव इत्यादी रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक होत असल्याचे वृत्त दैनिक भंडारा एक्स्प्रेस मध्ये प्रकाशित झाल्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घेऊन चुलबंद नदी खोऱ्यातील अवैध रेती वाहतूक बंद करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना आदेश दिले. शुक्रवारी सकाळपासूनच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नायक अंकुश पुराम आपले पथकासह चुलबंद नदीखोऱ्यात पेट्रोलिंग करीत असताना सकाळचे सुमारास पालांदूर जिल्हा परिषद शाळेजवळ जॉनडियर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एएल ३२२१ व निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली रेती वाहतूक करतांना दिसून आल्याने ट्रॅक्टर चालकास रॉयल्टीबाबद विचारणा केली असता नसल्याचे सांगितले. तसेच ट्रॅक्टर मालक कैलास ब्राम्हणकर यांचे सांगण्यावरून आर्थिक फायद्याकरिता रेती तस्करी करत असल्याचे सांगितल्याने ट्रॅक्टर ५ लाख, ट्रॉली १ लाख ५० व १ ब्रास रेती ६ हजर असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावर जप्त करून अवैध रेतीची वाहतूक, पर्यावरणाचे नुकसान करून शासनाचा महसूल बुडविल्याने ट्रॅक्टर चालक ओमेंद्र शिवणकर व मालक कैलास ब्राह्मणकर यांचे विरुद्ध पोलिस नायक अंकुश पुराम यांचे फिर्यादीवरून पालांदूर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक २०३/२०२४ कलम ३०३(२), ४९ भारतीय न्याय संहिता २०२३, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम(गौण खनिज) सहकलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९ आणि मोटारवाहन कायदा सहकलम ३(१), ५० नुसार गुन्हा दाखल केला असून पालांदूर पोलिस तपास करीत आहेत. आरोपीस अटक करून प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी लाखनी येथे पाठविण्यात आले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


0 टिप्पण्या