गणेश राजपूत जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबतच नसून बुधवारी देखील कालिंका माता मंदिर चौकात अपघातात एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी धडक देणाऱ्या डंपरची जाळपोळ केली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन विभागाच्या वाहनावर दगडफेक करीत नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, योजस बहऱ्हाटे आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत आयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात योजस बहऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. डंपरची आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करीत जमावाने ठिय्या मांडला. दरम्यान, जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करताच जमाव अधिक संतप्त झाला.घटनास्थळी आ. राजूमामा भोळे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस ताफा पोहचला असून जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.


0 टिप्पण्या