• माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पेंढरी येथील अल्पभूधारक शेतकरी श्यामराव शिवराम काळे(६०) यांचे घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, कापड, इलेक्ट्रॉनिक्स चे समान, शेतीपयोगी साहित्य व रोख रक्कम जळाल्याने तलाठी पेंढरी यांनी पंचनामा करून २ लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्याने श्यामराव काळे यांना शासनाने आर्थिक मदत करावी. अशी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी मागणी केली आहे.
अल्प भूधारक शेतकरी श्यामराव काळे कुटुंबासह वास्तव्यास असून शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्याचे जुनाट पद्धतीचे कौलारु घर असून समोर स्लॅब आहे. हे घर भरवस्तीत आहे. काळे कुटुंबीय शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेले असता मध्यरात्री दरम्यान तीळतीळ असा आवाज व धुरामुळे कुटुंब प्रमुख श्यामराव काळे यांची झोपमोड झाल्याने घर पेटत असल्याचे निदर्शनास आले. सर्वप्रथम त्यांनी झोपेतील कुटुंबीयांना जागे करून घराबाहेर काढले व आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. प्रशांत काळे, विक्की भोयर, भोजराम काळे, अनिकेत काळे, निखिल काळे, मधुकर काळे, प्रभू काळे व गावकऱ्यांच्या सहकार्याने सत्यभामा भोयर यांचे घरून मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. पेंढरी चे तलाठी गीता मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यात जीवनावश्यक वस्तू, रोख २४ हजार ५०० रुपये, घरातील संपूर्ण समान, शेतीपयोगी साहित्य व घरास असलेला लाकूड फाटा, कवेलू जळून खाक झाल्याने २ लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसा पंचनामा करून तहसीलदार लाखनी यांचेकडे पाठविला आहे. सदर कुटुंब नुकसान भरपाईस पात्र असल्यामुळे त्यांना शासनाने अर्थसाहाय्य करावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या