Ticker

6/recent/ticker-posts

कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ


तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 

सोलापूर :– घरगुती वादातून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचे २०१६ मध्ये पतीसोबत लग्न झाले होते. विवाहाच्या सुरुवातीच्या काळात दोघांचे नाते सुरळीत होते. मात्र, काही वर्षांनंतर नणंद आणि मेव्हणे यांच्या हस्तक्षेपामुळे घरगुती वातावरण तणावग्रस्त झाले. फिर्यादीच्या बहिणीच्या पतीचे आणि तिच्या नणंदेचे प्रेमसंबंध असल्याचा संशय फिर्यादीला आला. या गोष्टीवरून वाद निर्माण झाले आणि फिर्यादीवर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार सुरू झाले.

दि. ९ मार्च २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी घरी असताना पती, नणंद आणि मेव्हण्याने तिच्यावर हल्ला केला. पतीने तिच्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जबरदस्तीने केस कापण्यास भाग पाडले. यावेळी मेव्हण्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर नणंदेने केस ओढून तिला मारहाण केली. इतकेच नव्हे, तर पतीने तिचा चेहरा विद्रुप करण्याच्या उद्देशाने तिच्या भुवयांवर ट्रिमर फिरवला.

दि. २६ मार्च रोजी पतीने तिला घरात डांबून ठेवून गावाला जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित महिलेने २७ मार्चच्या रात्री उशिरा आपला जीव वाचवण्यासाठी घरातून पलायन करत आपल्या बहिणीकडे आसरा घेतला. फिर्यादीच्या मते, पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला वारंवार धमक्या दिल्या होत्या की, जर तिने कोठेही तक्रार दिली तर तिच्या कुटुंबीयांनाही ठार मारले जाईल.

पीडितेच्या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलिसांनी पती, नणंद आणि मेव्हण्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बार्शी शहर पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या