Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता – पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर: बार्शी तालुक्यातील वैराग येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा मागोवा लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

२६ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास मुलीचे पालक कामासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी ७ वाजता घरी परतल्यावर त्यांना मुलगी आढळली नाही. परिसरात शोध घेतला असता, घरासमोर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दुपारी २:३० वाजेपर्यंत मुलगी घरी दिसल्याचे सांगितले. त्यानंतर घर बंद असल्याचे निदर्शनास आले.

कुटुंबीयांनी नातेवाईक, पाहुणे आणि गावामध्ये शोध घेतला, मात्र मुलीचा कुठेही तपास लागला नाही. यामुळे कुटुंबीयांनी अनोळखी व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

बेपत्ता मुलगी १६ वर्षांची असून तिची उंची ५ फूट, रंग सावळा, डोळे काळे आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. ती काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान करत होती. तिच्या पायात सँडल होती. मराठी भाषेत बोलणारी ही मुलगी कोणाला दिसल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बेपत्ता मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वैराग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या