चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : बार्शी शहरातील मंगडे चाळ येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी कन्हैय्या राजाभाऊ ढाळे (वय २४) आणि सूरज उर्फ शिवराज पिंटू धोत्रे (वय २०) यांना न्यायालयाने जामीन नाकारला आहे. या दोघांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल असून, न्यायालयाने आरोपींविरोधातील पुरावे आणि तपासातील गांभीर्य लक्षात घेऊन जामीन फेटाळला.
११ मार्च २०२५ रोजी रात्री ८:५० वाजता बार्शी शहरातील मंगडे चाळ येथे फिर्यादी रमेश्वर शिवदास रामगुडे हे त्यांच्या मावस भावासोबत घरासमोर बोलत असताना आरोपी कन्हैय्या ढाळे, सूरज धोत्रे, कृष्णा ढाळे आणि एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. फिर्यादीचा मावस भाऊ वाईट नजरेने पाहतो, असा आरोप करत आरोपींनी शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
कन्हैय्या ढाळे याने फिर्यादीच्या डोळ्यांवर फाईटरने वार करून गंभीर दुखापत केली. कृष्णा ढाळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर सूरज धोत्रे याने दगडाने डोळ्याजवळ हल्ला केला. चौथ्या व्यक्तीने हाताने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या मावस भावालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
१२ मार्च रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. वैद्यकीय अहवालानुसार फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(र), ३(१)(स) आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना जामीन देऊ नये, अशी जोरदार मागणी केली. न्यायालयाने आरोपींविरोधातील पुरावे आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जामीन अर्ज फेटाळला. न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आदेश देताना नमूद केले की, आरोपींनी क्रूरपणे मारहाण केली असून, जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. आरोपींविरोधातील कठोर कारवाईसाठी सामाजिक संघटनांनी देखील पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बार्शी शहरात या घटनेबद्दल संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.


0 टिप्पण्या