चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : करमाळा शहरातील बायपास रोड येथील ७२ बंगला परिसरात एका पतीने पत्नीवर कुन्हाडीने जीवघेणा हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची अत्यंत धक्कादायक व खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. १८ एप्रिल २०२५) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वैवाहिक वाद, दारूचे व्यसन आणि रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर कुन्हाडीने घाव घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मंगुश्री सुधाकर घोरपडे (वय ३८, रा. ७२ बंगला, करमाळा) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सुधाकर मुरलीधर घोरपडे याच्यावर भारतीय दंड विधानाच्या नव्या कलमांनुसार (कलम ११५, ११८(१), ३५१(२), ३५२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील असा आहे की, सुधाकर घोरपडे याला गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे अतिशय वाईट व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो नेहमीच घरच्यांवर व शेजाऱ्यांवर आरडाओरड करत असे. शुक्रवारीही तो सकाळच्या सुमारास नशेत घरी आला व घराच्या परिसरात शेजाऱ्यांशी वाद घालत त्यांच्यावर शिवीगाळ करू लागला. पत्नी मंगुश्री यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने पत्नीवर आधी लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी सासूबाई बसवंती घोरपडे व शेजारी हस्तक्षेप करत असतानाच सुधाकर घोरपडे यांनी अचानक घरात ठेवलेली कुन्हाड उचलली व पत्नी मंगुश्री यांच्या डोक्यावर जबरदस्त फटका मारला. या हल्ल्यात त्या जागीच कोसळल्या असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला.
त्यांचा आक्रोश ऐकून घरातील दीर कमलाकर व जाऊ लता घोरपडे धावत आले. त्यांनी सुधाकरला अडवून जखमी मंगुश्री यांना तात्काळ लावंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांच्या डोक्याचे स्कॅनिंग करण्यात आले असून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातही नेण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर लावंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच करमाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक विनोद प्रभू घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपी सुधाकर घोरपडे याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे


0 टिप्पण्या