चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बोलेरो पिकअप चालकाने दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोतीराम बोदर (पो.कॉ. ७४७) यांनी फिर्याद दिली असून, त्यांनी सांगितले की, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या अपघात पथकात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना डायल ११२ वरून माहिती मिळाली की, बार्शी-कुडुवाडी मार्गावर पराग हॉटेल समोर एका बोलेरो पिकअपचा चालक दारूच्या नशेत वाहन चालवत आहे.
त्यानंतर, पोलीस कॉन्स्टेबल बोदर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी दासरे घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की, बोलेरो पिकअप (MH 45 AF 8077) चालक अत्यंत बेफिकीरपणे आणि वेडीवाकडी गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने स्वतःचे नाव मनोज भागवत आवारे (वय ३०, रा. पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर) असे सांगितले.
पोलिसांनी चालकाकडे वाहन परवाना असल्याची विचारणा केली असता, त्याने परवाना जवळ असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या तोंडाला दारूचा उग्र वास येत असल्याने पोलिसांनी ब्रिथ अॅनालायझर मशीनद्वारे त्याची तपासणी केली. या चाचणीत त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ९४.०४ mg/100ml इतके आढळून आले, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी पोलिसांनी चालक मनोज भागवत आवारे याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप विष्णू ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणे हे स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे असते. त्यामुळे नागरिकांनी अशा निष्काळजीपणाच्या कृत्यांना थारा न देता वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या