चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर: भिलारवाडी शिवारात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करताना करमाळा पोलिसांच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे एक पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले असून, दोघांविरुद्ध प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा पोलीस ठाण्यात दाखल FIR क्र. 0422 नुसार, ही घटना दिनांक 24 मे रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस शिपाई सोमनाथ विठ्ठल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी पोहवा घोरपडे, पोकॉ काळे आणि पोकॉ वलटे असे जिंती उपपोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, आरोही पेट्रोलपंपाजवळून जाणाऱ्या एका पिकअप (क्रमांक MH-45 AX-1323) मधून जनावरांचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले.
सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, पाठीमागील हौदयामध्ये तीन गायी अत्यंत अमानुषपणे कोंबून बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पिकअपचा चालक मयुर शिवाजी सुरवसे (रा. खडकेवाडी, ता. करमाळा) याच्याकडे जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कोणतीही परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा खरेदी पावती आढळली नाही. चौकशी दरम्यान, या गायी अफझल इक्बाल कुरेशी (रा. आंबेडकर नगर, राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याच्या सांगण्यानुसार वाहून नेल्या जात असल्याचे समोर आले.
पुढील कारवाईसाठी वाहन व चालक करमाळा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धुमाळ यांनी गायींची तपासणी करून त्या निराश्रितपणे वागवल्याचा अहवाल दिला. जनावरांना पाणी, चारा व औषधोपचाराची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. सदर गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना खात्री पटली.
या प्रकरणी मयुर सुरवसे व अफझल कुरेशी यांच्या विरोधात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1), 11(1)(a), 11(1)(f), 11(1)(h), 11(1)(i), 11(1)(k) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत कलम 5(A) आणि 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. जनावरांच्या अमानुष वाहतुकीवर कारवाई करून करमाळा पोलिसांनी जनजागृतीसह कायद्याचा प्रभावी अंमल केला आहे.
0 टिप्पण्या