Ticker

बार्शी-वैराग रस्त्यावर कंटेनरला पाठीमागून धडकून युवक ठार; मित्र गंभीर जखमी, पोलिसांकडून कंटेनर चालकाचा शोध सुरू

अपघाताची दुर्दैवी घटना 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापुर – बार्शी-वैराग रस्त्यावरील पानगावजवळ काल (ता. 22 मे) दुपारी सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. कंटेनरने अचानक ब्रेक मारून गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवल्याने त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट त्या कंटेनरला धडकली. या अपघातात विशाल दशरथ गोंगाणे (वय 25, रा. दहिटणे, ता. बार्शी) या युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र हणुमंत दादासाहेब गाटे (वय 27, रा. दहिटणे) गंभीर जखमी झाला आहे.

हणुमंत गाटे हे बेदाणा व्यवसायिक असून ते आपल्या कुटुंबासमवेत दहिटणे येथे राहतात. काल ते त्यांच्या मित्र विशाल गोंगाणे यांच्यासह बार्शी येथे कामासाठी आले होते. काम आटोपून ते दोघे दुचाकी (क्रमांक MH-13-DV-8596) वरून आपल्या गावी परत निघाले होते. दुचाकी विशाल गोंगाणे चालवत होता तर हणुमंत गाटे मागे बसले होते.

दुपारी सुमारे 3.15 वाजण्याच्या सुमारास, पानगाव गावाच्या पुढे कॅनलनजीक असताना त्यांच्या समोरून एक कंटेनर (क्रमांक MH-20-GC-8926) जात होता. अचानक त्या कंटेनरच्या चालकाने कोणताही सिग्नल न देता रस्त्याच्या मधोमध ब्रेक मारून वाहन थांबवले. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येण्याआधीच दुचाकी कंटेनरला जोरात पाठीमागून धडकली.

या जोरदार धडकेत विशाल आणि हणुमंत दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांना बार्शीतील जगदाळे मामा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले.

उपचारादरम्यान विशाल गोंगाणे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर हणुमंत गाटे हे गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. शुद्धीवर आल्यावर हणुमंत यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबात अपघाताचे संपूर्ण वर्णन दिले असून, त्यांनी सांगितले की कंटेनर चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता गाडी थांबवल्यामुळे हा अपघात घडला. तसेच, त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

हणुमंत गाटे यांच्या जबाबाच्या आधारे बार्शी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात भा.दं.सं. अंतर्गत अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कंटेनरचा क्रमांक उपलब्ध असून, चालकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील निष्काळजी कंटेनर चालकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून होत आहे.

विशाल गोंगाणे याच्या अचानक निधनाने दहिटणे गावात शोककळा पसरली आहे. अत्यंत शांत, प्रेमळ आणि मेहनती स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या मित्रमंडळी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तर हणुमंत गाटे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी नातेवाईक आणि मित्र प्रार्थना करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या