चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे: रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर कमिटीच्या वतीने रुग्ण आणि अपंग नागरिकांच्या जीवनात आनंद आणि स्वावलंबनाचा नवा प्रकाश आणणारा एक हृदयस्पर्शी सोहळा नुकताच पार पडला. या उपक्रमात १० गरजू रुग्णांना आणि अपंग बांधवांना मोफत व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या. ख्रिस्ती फादर डॉ. विनोद गुडे, शंकुतला भोसले, रानोजी कांबळे, विजू रोकडे, मीनाबाई सौंदरमल, विश्वास केंजळे, भीमराव वाघमारे, रफिक शेख, हिदायत खान आणि स्वाती आटोळे यांना या व्हीलचेअरचा लाभ मिळाला. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा साठ्ये मारणे यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, गेल्या १४ वर्षांपासून रुग्णांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अथक लढा देत आहोत. माझ्या सहकाऱ्यांच्या प्रेरणादायी सात सोबतीने ही चळवळ महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. रुग्णांना आधार, उपचार आणि त्यांचे हक्क मिळवून देण्याचे कार्य रुग्ण हक्क परिषदेने अविरतपणे केले आहे. “रुग्णांची सेवा हाच आमचा धर्म आहे. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि स्वावलंबनाने जगता यावे, हाच आमचा संकल्प आहे,” असे उमेश चव्हाण म्हणाले.
व्हीलचेअर मिळालेल्या प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाचा भाव दिसत होता. या व्हीलचेअरमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होणार असून, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची नवी संधी मिळणार आहे. “ही व्हीलचेअर आमच्यासाठी केवळ साधन नाही, तर स्वातंत्र्य आणि सन्मानाचं प्रतीक आहे,” असे ख्रिस्ती फादर डॉक्टर विनोद गुडे यांनी कृतज्ञतेने सांगितले.
पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा साठ्ये- मारणे म्हणाल्या की, “रुग्ण आणि अपंग बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या चळवळीची खरी कमाई आहे,”
हा सोहळा केवळ व्हीलचेअर वितरणापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागील भावना आणि संकल्प यांनी सर्वांना प्रेरणा दिली. रुग्ण हक्क परिषदेच्या या कार्यामुळे पुणेकरांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली आहे. “जिथे गरज आहे, तिथे आम्ही आहोत. रुग्णांचे हक्क आणि सन्मान यासाठी आमचा लढा कायम सुरू राहील,” असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.
या हृदयस्पर्शी सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, रुग्ण हक्क परिषद ही केवळ एक संस्था नसून, मानवतेच्या सेवेतील एक अखंड यज्ञ आहे.
*अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद- पुणे शहर कार्यालय, मो. 8956185702
0 टिप्पण्या